आप आवळा देऊन कोहळा काढण्याच्या तयारीत? काँग्रेसकडे दिल्लीच्या बदल्यात या राज्यांमध्ये केली जागांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 12:08 PM2024-01-09T12:08:25+5:302024-01-09T12:17:51+5:30
Lok sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी आता जागावाटपाबाबत चर्चा सुरू केली आहे. सोमवारी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी बैठक घेऊन जागावाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत चर्चा केली.
लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी आता जागावाटपाबाबत चर्चा सुरू केली आहे. सोमवारी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी बैठक घेऊन जागावाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत चर्चा केली. यावेळी दोन्ही पक्षांनी आपल्या आमदार आणि खासदारांच्या संख्येच्या प्रमाणात भागीदारी देण्याचा प्रस्ताव ठेवला. याचवेळी आपने गुजरात, हरियाणा आणि गोव्यामध्ये जागा देण्याची मागणी केली. मात्र सध्या दोन्ही पक्षांमध्ये कुठलाही समाधानकारक फॉर्म्युला निघालेला नाही. म्हणजेच दोन्ही
पक्षातील नेते, पुन्हा चर्चा करणार आहेत. तसेच जागावाटपाबाबतचा अंतिम निर्णय घेणार आहेत.
काँग्रेस आणि आपच्या नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीत काँग्रेसच्या नॅशनल अलायन्स समितीचे प्रमुख मुकुल वासनिक, अशोक गहलोत यांच्यासह जागावाटप समितीचे सदस्य सहभागी झाले होते. तर आम आदमी पक्षाचं प्रतिनिधित्व खासदार संदीप पाठक, आतिशी मार्लेना आणि सौरभ भारद्वाज यांनी केलं. मात्र या बैठकीत झालेल्या चर्चेबाबत कुठलीही माहिती प्रसारमाध्यमासमोर आलेली नाही. पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आम आदमी पक्षाने दिल्लीमध्ये कांग्रेसला लोकसभेच्या तीन जागा देण्याचा प्रस्ताव दिला आहे.
दिल्लीमध्ये लोकसभेच्या ७ जागा असून, २०१४ आणि २०१९ मध्ये दिल्लीतील सर्वच्या सर्व जागांवर भाजपाने विजय मिळवला होता. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला दिल्लीमध्ये ५६ टक्के मतं मिळाली होती. तर काँग्रेसला २२ आणि आम आदमी पक्षाला १८ टक्के मतं मिळाली होती. दिल्लीतील सातही लोकसभा मतदारसंघामध्ये आप आणि काँग्रेसच्या मतांची बेरीज ही भाजपाच्या उमेदावारांन मिळालेल्या मतांपेक्षा अधिक नव्हती.
दिल्लीप्रमाणेच पंजाबमध्ये आपने काँग्रेसला ६ जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. पंजाबमध्ये लोकसभेच्या एकूण १३ जागा आहेत. म्हणजेच दिल्ली आणि पंजाबमध्ये आप काँग्रेससोबत जागावाटपामध्ये ५०-५० चा फॉर्म्युला वापरण्यास तयार आहे. मात्र यातही स्वत:ला मोठ्या भावाच्या रूपात ठेवण्याचा आपचा प्रयत्न असेल. याशिवाय आम आदमी पक्षाने गुजरातमध्ये एक, हरियाणामध्ये तीन आणि गोव्यामध्ये एका जागेची मागणी केली आहे. गुजरातमध्ये लोकसभेच्या २६ जागा असून, मागच्या दोन निवडणुकांमध्ये येथे भाजपाने सर्वच्या सर्व जागा जिंकल्या होत्या. दरम्यान, आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमधील भरूच लोकसभा मतदारसंघातून चैतर वसावा यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे.
आतापर्यंत दिल्ली, पंजाब, हरियाणा, गुजरात आणि गोवा या राज्यांमध्ये काँग्रेस पक्ष हा स्वबळावर लढत आला आहे. दरम्यानच्या काळात दिल्ली आणि पंजाबमध्ये आपची सत्ता आल्याने इंडिया आघाडीतील हे पक्ष या दोन राज्यांतील जागावाटपाबाबतच चर्चा करतील, अशी शक्यता होती. मात्र आम आदमी पक्षाने पंजाब आणि दिल्लीसह इतर राज्यांमधील जागावाटपाबाबत विचार करण्यास काँग्रेसला भाग पाडलं आहे. त्यामुळे आता आम आदमी पक्षाने दिलेल्या प्रस्तावावर काँग्रेस हायकमांड काय निर्णय घेणार हे पाहावे लागणार आहे.
दिल्ली आणि पंजाबमधील काँग्रेसची सत्ता खेचून घेताना आम आदमी पक्षाने गुजरात आणि गोव्यामध्येही काँग्रेसच्या व्होट बँकेला सुरुंग लावला आहे. मात्र आम आदमी पक्षाला सोबत न घेतल्यास नुकसान होण्याची शक्यता असल्याने काँग्रेस जागावाटपात औदार्य दाखवू शकते.