भोपाळ प्रशासनाने लोकसभा निवडणूक 2024 मध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी अनोखा पुढाकार घेतला. येथे मतदानाच्या दिवशी प्रत्येक बूथवर लकी ड्रॉ जाहीर करण्यात आला, ज्यामध्ये प्रत्येक बुथवर भाग्यवान मतदारांना भेटवस्तू मिळाल्या. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मंगळवारी भोपाळमध्ये मतदान झालं. या निवडणुकीत एक मतदार भाग्यवान ठरला. मतदाराने आपल्या मतदान केंद्रावर पोहोचून मतदान केलं आणि लकी ड्रॉमध्ये हिऱ्याची अंगठी जिंकली.
मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी भोपाळ प्रशासनाने अनोखा पुढाकार घेतला. यावेळी प्रशासनाने लकी ड्रॉ काढला, ज्यामध्ये एका मतदाराला हिऱ्याची अंगठी मिळाली. सहाय्यक नोडल अधिकारी रितेश शर्मा यांनी सांगितलं की, गेल्या दोन टप्प्यातील कमी मतदानाची टक्केवारी लक्षात घेऊन भोपाळ प्रशासनाने मतदारांना घराबाहेर पडून मतदान करण्याचं आवाहन केलं होतं.
मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी लकी ड्रॉ काढण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. रितेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही लकी ड्रॉ काढला, ज्यामध्ये तीन मतदारांचा समावेश होता. बूथ क्रमांक 211 वर एका मतदाराला हिऱ्याची अंगठी सापडली आहे. प्रत्येक बूथला भेटवस्तू मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं. भोपाळमधील 2,000 हून अधिक मतदान केंद्रांवर प्रत्येकी तीन लकी ड्रॉ काढण्यात आले. यामध्ये रेफ्रिजरेटर आणि टेलिव्हिजनपासून डायमंड रिंगपर्यंतच्या बक्षिसांचा समावेश होता.
मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने भोपाळमधील प्रत्येक बूथवर विशेष तयारी केली होती. मतदानाच्या दिवशी बूथबाहेर फुगे लावून विशेष सजावट करण्यात आली. लोकशाही दिनाच्या उत्सवात नागरिकांनी उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहनही प्रशासनाने केले होते. मतदारांना मतदान करताना कोणतीही अडचण येऊ नये, याची दक्षता घेण्यात आली. बूथच्या बाहेर मंडपही लावण्यात आला होता. पिण्याच्या पाण्याबरोबरच कुलरचीही व्यवस्था करण्यात आली होती.