लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर, आता बुधवारी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (NDA) बैठक होणार आहे. या बैठकीनंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन त्यांच्याकडे सरकार स्थापनेसाठीचे समर्थनपत्रही सादर करू शकता. यासंदर्भात, एबीपी न्यूजने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे.
संबंधित वृत्तानुसार, शुक्रवारी (7 जून, 2024) दुपारी 2.30 वाजता संसद भवनामध्ये एनडीएतील खासदारांची बैठक होईल. या बैठकीत एनडीए (NDA) शासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विविध पक्षांचे अध्यक्ष उपस्थित राहतील.
याच बरोबर, यावेळी नव्याने स्थापन होणाऱ्या सरकारचा चेहरा काहीसा वेगळा असू शकतो, असा कयासही राजकीय वर्तुळातून वर्तवला जात आहे. कारण, भाजप 2014 नंतर पहिल्यांदाच बहुमताचा आकडा 272 पासून दूर राहिला. यामुळे त्यांना आता एनडीएतील इतर पक्षांवर अवलंबून राहावे लागेल.
कुणाला किती जागा? -या लोकसभा निवडणुकीत भाजपला 240 जागा मिळाल्या आहेत. याशिवाय, तेलुगू देशम पार्टीला (TDP) 16, जेडीयूला 12, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 7 आणि चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीला (रामविलास) 5 जागा मिळाल्या आहेत. हे पक्ष सरकार स्थापनेत महत्वाची भूमिका बजावतील.