कटक : सत्तेत आल्यास विरोधी आघाडीत सहभागी पक्षांना एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपद देण्याचे समीकरण ‘इंडिया’ आघाडीने आणले आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केला. अशा समीकरणाकडून देशाच्या भल्याची अपेक्षा केलीच जाऊ शकत नाही, असे ते येथे एका निवडणूक प्रचार सभेला संबोधित करताना म्हणाले.
‘इंडिया आघाडीने एक नवे समीकरण आणल्याचे मी ऐकले आहे... त्यांनी (इंडिया आघाडी) सर्व भागीदारांना खुश करण्यासाठी सत्तावाटपाचे समीकरण आणले आहे. जर त्यांना पाच वर्षांसाठी (राज्य करण्याची) संधी मिळाली, तर प्रत्येकाला एक वर्षासाठी पंतप्रधानपद मिळेल, असे त्यांनी आपल्या आघाडीतील भागीदारांना सांगितले आहे. जर देश कोणाच्या हाती सोपवायचा आहे तर आम्ही सोपवण्यापूर्वी विचार करू की नाही? तुम्ही कोणाच्याही हाती देश सोपवणार का? संबंधित व्यक्ती देश सांभाळण्यास सक्षम आहे किंवा नाही हे आम्ही पाहणार ही नाही? तुमच्याकडे असे कोण आहे ज्याच्या खांद्यावर लोक देशाची जबाबदारी साेपवू शकतात? एखादे नाव आहे का?, असे सवाल मोदींनी यावेळी उपस्थित केले.
राम मंदिराचे निमंत्रण नाकारले, आता त्यांना जनता नाकारेल
सिरसी (कर्नाटक) : राम मंदिराच्या मुद्द्यावर पंतप्रधानांनी येथे काँग्रेसवर घणाघाती हल्ला चढवला. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण ज्यांनी नाकारले, त्यांना लोकसभा निवडणुकीत जनता नाकारेल, असे ते म्हणाले. खरेतर देश स्वतंत्र झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी राममंदिर उभारणीचा निर्णय व्हायला हवा होता. असे माेदी म्हणाले.
‘ते नवाब, निजामांबाबत बोलत नाहीत’ : राहुल यांच्यावर तुष्टीकरणाच्या राजकारणाचा आरोप करताना मोदी बेळगावमध्ये म्हणाले की, त्यांनी भारतातील राजे, महाराजांचा अपमान केला. मात्र, नवाब, निजाम, सुलतान व बादशहांनी केलेल्या अत्याचारांबाबत चकार शब्द काढला नाही. हे त्यांचे तुष्टीकरणाचे राजकारण आहे.