Amit Shah Nomination: आज देशातील 102 लोकसभा मतदारसंघासाठी पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. एकीकडे मतदानाची धुम सुरू आहे, तर दुसरीकडे अनेक उमेदवार पुढील टप्प्यासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीदेखील आज, शुक्रवारी (19 एप्रिल) गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
PM मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील: अमित शाहअर्ज भरल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अमित शाह म्हणाले की, 'आज मी गांधीनगर मतदारसंघातून उमेदवारी दाखल केली. नरेंद्र मोदी स्वत: गांधीनगर मतदारसंघाचे मतदार आहेत. शिवाय लालकृष्ण अडवाणी, अटल बिजारी वाजपेयी यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. मी गेली 30 वर्षे या मतदारसंघातून आमदार आणि खासदार राहिलो आहे, ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे.'
'या निवडणुकीत नरेंद्र मोदींना प्रचंड बहुमताने तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी संपूर्ण देश उत्सुक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने संपूर्ण नावलौकिक मिळवले आहे. यूपीए सरकारने निर्माण केलेली पोकळी भरण्यासाठी जनतेने आम्हाला 10 वर्षे दिली, आता पुढील 5 वर्षात विकसित भारताचा पाया घालायचा आहे. मी देशातील मतदारांना आवाहन करतो की, प्रचंड बहुमताने सर्वत्र कमळ फुलवा.' गांधीनगर लोकसभा जागेसाठी 7 मे रोजी मतदान होत आहे.
अमित शाह यांचा रोड शो आणि रॅली अमित शाह गांधीनगरमध्ये तीन रोड शो आणि रॅलीला संबोधित करणार आहेत. पहिला रोड शो अहमदाबाद जिल्ह्यातील सानंद शहरात तर दुसरा गांधीनगर जिल्ह्यातील कलोल शहरात होणार आहे. यानंतर अहमदाबाद शहरात तिसरा रोड शो होईल. रोड शो केल्यानंतर शाह अहमदाबाद शहरातील वेजलपूर भागात निवडणूक रॅलीला संबोधित करतील.