Amit Shah files Nomination on special timing: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. या जागेवरून शाह हे भाजपाचे उमेदवार आहेत. गुजरातमधील गांधीनगरमध्ये तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आज अमित शाह यांनी अर्ज भरला. गांधीनगरचे जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे अमित शाह यांनी उमेदवारी अर्ज सुपूर्द केला. यात खास गोष्ट अशी की, त्यांनी अर्ज सुपूर्द केला त्यावेळी त्यांनी एक विशिष्ट मूहुर्त साधला. शाह यांनी दुपारी 12:39 वाजता उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी शेअर केलेल्या फोटोत भिंतीवर लावलेल्या घड्याळातही ती वेळ स्पष्ट दिसून येते. अमित शाह यांनी याच वेळी अर्ज का भरला, याचे कारण खास आहे.
12 वाजून 39 मिनिटांनी का भरला अर्ज?
अमित शाह हे देशाचे गृहमंत्री आहेत. त्यांना शक्य असेल तेव्हा आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून ते आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येऊ शकत होते. तरीही त्यांनी 12 वाजून 39 मिनिटांनी अर्ज भरून सुपूर्द केला कारण हा काळ 'विजय मुहूर्त' मानला जातो. अमित शाह किंवा इतर कोणत्याही भाजपा नेतेमंडळींनी याबाबत अधिकृत विधान केलेले नाही. परंतु, ही वेळ खास मानली जाते असे सांगण्यात येत आहे.
फोटो शेअर करताना शाह यांनी ट्विट केले की, आज मी गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. या लोकसभा निवडणुकीत या भागातील जनतेच्या आशीर्वादाने मोदीजींच्या नेतृत्वाखाली गेल्या ५ वर्षात प्रदेशातील जनतेची सेवा करण्याची संधी पुढेही सुरू ठेवण्यासाठी मी उत्सुक आहे. मला विश्वास आहे की गांधीनगरची जनता आपले आशीर्वाद देतील आणि पुन्हा एकदा मोदी सरकारला विजयी करण्यात मोठे योगदान देतील.
मोदी स्वत: ज्या मतदारसंघात मतदान करतात, तेथून मला तिकीट मिळणे माझं भाग्यच!
"मी 30 वर्षांपासून या मतदारसंघाचा आमदार आणि खासदार आहे. इथेच एका छोट्या बूथ कार्यकर्त्याचे काम मी सुरु केले आणि नंतर संसदेत पोहोचलो. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व लालकृष्ण अडवाणी, अटलजी यांनी केले ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. ज्या जागेवर नरेंद्र मोदीजी स्वत: मतदार आहेत, त्या जागेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी भाजपाने मला दिली आहे हे माझे भाग्यच समजतो", असेही शाह म्हणाले.
दरम्यान, भाजपचे माजी अध्यक्ष गांधीनगर मतदारसंघातून 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पाच लाखांपेक्षा जास्त मतांनी विजयी झाले होते. यंदा गुजरातमधील लोकसभेच्या सर्व 26 जागांसाठी तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी मतदान होणार आहे.