केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तेलंगणा दौऱ्यावर आहेत. शनिवारी त्यांनी एका रॅलीला संबोधित केलं आणि नंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपा तेलंगणात 10 पेक्षा जास्त जागा जिंकेल असा दावा अमित शाह यांनी केला. अरविंद केजरीवाल यांच्या टीकेवर ते म्हणाले की, "पंतप्रधान मोदी हा कार्यकाळ पूर्ण करतील आणि देशाचे नेतृत्व करत राहतील."
"बघा, मी अरविंद केजरीवाल अँड कंपनी आणि संपूर्ण इंडिया आघाडीला सांगू इच्छितो की, मोदीजी 75 वर्षांचे होतील याचा आनंद होण्याची गरज नाही. हे भारतीय जनता पक्षाच्या घटनेत कुठेही लिहिलेले नाही. मोदीजीच हा कार्यकाळ पूर्ण करतील आणि मोदीजीच देशाचं नेतृत्व करत राहतील. यावरून भाजपामध्ये कोणतंही कन्फ्यूजन नाही."
आप कार्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित करताना केजरीवाल म्हणाले होते की, "मोदीजी पुढील वर्षी 17 सप्टेंबर रोजी 75 वर्षांचे होत आहेत. 2014 मध्ये मोदीजींनी असा नियम केला होता की, भाजपामध्ये जे 75 वर्षांचा असतील त्यांना निवृत्त केलं जाईल, आधी लालकृष्ण अडवाणी निवृत्त झाले, नंतर मुरली मनोहर जोशी, सुमित्रा महाजन, यशवंत सिन्हा निवृत्त झाले."
"आता मोदीजी पुढच्या वर्षी 17 सप्टेंबरला निवृत्त होणार आहेत. मला भाजपाला विचारायचं आहे की, तुमचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण आहे? जर यांचे सरकार स्थापन झाले, तर मोदीजींचे सर्वात महत्त्वाचे व्यक्ती अमित शाह यांना पंतप्रधान करतील. मोदीजी स्वत:साठी नाही तर अमित शाह यांच्यासाठी मत मागत आहेत." यावर आता अमित शाह यांनी पलटवार केला आहे.