नवी दिल्ली : देशात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान शुक्रवारी पार पडले. आता उर्वरित टप्प्यातील निवडणुकीसाठी राजकीय पक्षांच्या प्रचारसभा होत आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुन्हा एकदा समान नागरी कायद्याबाबत (यूसीसी) मोठे वक्तव्य केले आहे. केंद्रात भाजपा सलग तिसऱ्यांदा विजयी झाल्यास संपूर्ण देशात समान नागरी कायदा लागू करण्यात येईल असे अमित शाह यांनी म्हटले आहे. तसेच, जगातील कोणत्याही लोकशाही देशात वैयक्तिक कायदे (पर्सनल लॉ) नाहीत, असेही अमित शाह म्हणाले.
इंडिया टुडे टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत अमित शाह म्हणाले, "देश शरियाच्या आधारावर किंवा वैयक्तिक कायद्याच्या आधारावर का चालवायचा? कोणताही अशाप्रकारे चालला नाही. कोणत्याही लोकशाही देशात वैयक्तिक कायदा नाही. जगात असे का होते?" तसेच, गृहमंत्री अमित शाह यांनी पुढे असा युक्तिवाद केला की, जगात अनेक मुस्लिम देश आहेत जिथे शरिया कायद्याचेही पालन केले जात नाही. काळ पुढे सरकला आहे. आता भारतालाही पुढे जाण्याची गरज आहे."
अमित शाह म्हणाले की, जगातील सर्व लोकशाही देशांमध्ये समान नागरी कायदा आहे. त्यामुळे आता वेळ आली आहे की भारतानेही तेच केले पाहिजे. समान नागरी कायदाच्या मसुदा तयार करण्यात येत होता. तेव्हा समान नागरी कायदा संविधान सभेने देशाला दिलेले एक वचन होते. तसेच, अमित शाह यांनी समान नागरी कायद्यावर टीका करणाऱ्या काँग्रेसवरही हल्लाबोल केला. ते म्हणाले, "धर्मनिरपेक्ष देशात सर्वांसाठी एकच कायदा नसावा का? हे धर्मनिरपेक्षतेचा सर्वात मोठे संकेत आहे. व्होट बँकेच्या राजकारणामुळे संविधान सभेद्वारे दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी काँग्रेस अपयशी ठरली आहे"
उत्तराखंड हे समान नागरी कायदा लागू करणारे पहिले राज्यउत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू झाल्यानंतर या कायद्यावर सामाजिक, न्यायिक आणि संसदीय दृष्टिकोनातून चर्चा केली जाईल, असे अमित शाह म्हणाले. दरम्यान, स्वातंत्र्यानंतर उत्तराखंड हे समान नागरी कायदा लागू करणारे पहिले राज्य ठरले आहे. तसेच, दरम्यान, देशात समान नागरी कायदा लागू करणे हे भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या जाहीरनाम्यातील एक प्रमुख निवडणूक आश्वासन आहे.