केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी गांधीनगर लोकसभा मतदारसंघात रोड शो केला. याच दरम्यान, एबीपी न्यूजशी बोलताना अमित शाह म्हणाले की, ज्या शहरात ते कधीकाळी भिंतींवर पोस्टर लावायचे, तेथील लोकांचे प्रेम पाहून आज बरं वाटतं. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावरही त्यांनी हल्लाबोल केला आहे.
प्रियंका गांधी यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, "जेव्हा तुम्ही काहीही करू शकत नसाल, तेव्हा तुम्ही ईव्हीएमला दोष देता. तेलंगणा आणि हिमाचलमध्ये काँग्रेसने सरकार स्थापन केलं तेव्हा ईव्हीएम ठीक होतं. आता हरले तर नाचता येईना अंगण वाकडे." राहुल गांधी यांच्या आरोपांना उत्तर देताना अमित शाह यांनी जेव्हा काँग्रेसच त्यांना गांभीर्याने घेत नाही, मग तुम्ही त्यांना का घेत आहात? संपूर्ण देशात कोणतंही आव्हान नाही. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेच्या 400 जागा पार करतील. पुन्हा एकदा पंतप्रधान होणार आहेत असं म्हटलं.
गांधीनगरमधून दुसऱ्यांदा निवडणूक लढवणारे अमित शाह यांनी गांधीनगरमधूनच निवडणूक प्रचाराला सुरुवात केली. वास्तविक, ते प्रथम भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचे निवडणूक प्रतिनिधी बनले. 2019 मध्ये गांधीनगरमधून विजयी झाल्यावर अमित शाह यांनी मागील सर्व मार्जिन मोडल्या होत्या. भाजपाने 10 लाख मतांनी जिंकण्यांचं टार्गेट ठेवलं आहे.
अमित शाह देशाच्या इतर भागात प्रचारात व्यस्त असताना दुसरीकडे त्यांच्या पत्नी गांधीनगरमध्ये प्रचारात व्यस्त होत्या. अलीकडच्या काही दिवसांत शाह यांच्या पत्नी सोनल शाह यांनी गांधीनगर लोकसभा मतदारसंघात घरोघरी जाऊन प्रचार केला आणि लोकांकडे मतं मागितली. याशिवाय भाजपाच्या कामगिरीचीही माहिती देण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे अनेक पदाधिकारीही उपस्थित होते. गांधीनगरमधून अमित शाह यांच्या विरोधात काँग्रेसने सोनल पटेल यांना उमेदवारी दिली आहे.