Amit Shah trolls Mamta Banerjee, Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू झाली असून आता प्रचारसभांचा धडाका सुरु झाला आहे. पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपचे बडे नेतेमंडळी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असल्याचे दिसत आहे. सोमवारी पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्रात प्रचाराचा नारळ वाढवला. त्यानंतर आता त्यांच्या देशभरात अनेक सभा होणार आहेत. त्याशिवाय, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याही प्रचार सभा सुरु आहेत. अमित शाह यांनी बुधवारी पश्चिम बंगालमधील दक्षिण दिनाजपूर येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले. निवडणूक रॅलीदरम्यान अमित शहा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. भाजपला मत द्या हे सांगताना त्याचा परिणाम ममतदीदींवर होऊ दे, असे आवाहन अमित शाह यांनी केले.
"मी आज येथील माता-भगिनींना सांगायला आलो आहे की ही निवडणूक संदेशखाली प्रकरणातील आरोपींना धडा शिकवण्यासाठीची निवडणूक आहे. तुम्ही कमळाचे बटण दाबा. मतदानाच्या वेळी कमळाचे बटण इतक्या जोरात दाबा की तुम्ही बालुरघाटमध्ये बटण दाबलं की त्याचा करंट ममता दीदींना कोलकातामध्ये लागायला हवा," असे अमित शाह म्हणाले. "तुम्ही २६ तारखेला नक्की मतदान करा, कमळाचे बटण दाबून भाजपाला नक्की विजयी करा आणि म्हणा भारत माता की जय.. वंदे मातरम," असे आवाहन त्यांनी केले.
"काँग्रेस, टीएमसी आणि कम्युनिस्ट पक्ष ७० वर्षांपासून राम मंदिराचा प्रश्न रखडवून ठेवत होते. मोदी सरकारच्या काळात राम मंदिराच्या मुद्द्यावर निर्णय झाला, भूमिपूजन झाले आणि राम मंदिरही बांधले गेले. ५०० वर्षांनंतर रामलला त्यांचा वाढदिवस रामनवमीला त्यांच्या भव्य मंदिरात साजरा करणार आहेत. तसेच मोदीजी देशभरातील गरिबांसाठी 5 लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचाराचा खर्च उचलत आहेत, परंतु पश्चिम बंगालमधील लोकांना आयुष्मान योजनेचा लाभ मिळत नाही. ममता दीदींनी येथे आयुष्मान योजना लागू केलेली नाही. ममता सरकार हद्दपार केलेत तर प्रत्येकाला ५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत मिळतील," असेही शाह म्हणाले.