लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशातील हरदोई येथे भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी आलेले गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना इशारा दिला आहे. झारखंडमधील मंत्र्यांच्या स्वीय सहायकाच्या नोकराच्या घरातून रोख रक्कम जप्त केल्याच्या प्रकरणाचा संदर्भ देताना गृहमंत्र्यांनी हा इशारा दिला.
अमित शाह म्हणाले की, "ही घमंडीया आघाडी आहे, सपा, काँग्रेस, टीएमसी... या सर्वांनी एकत्र येऊन 12 लाख कोटी रुपयांचे घोटाळे केले आहेत. कालच झारखंडमध्ये इंडिया आघाडीच्या मंत्र्याच्या स्वीय सहायकाच्या नोकराच्या घरातून 30 कोटी रुपये जप्त करण्यात आले."
"काही दिवसांपूर्वी काँग्रेस खासदाराच्या घरातून 350 कोटी रुपये जप्त करण्यात आले होते. त्याच्या काही दिवसांआधी टीएमसीच्या एका नेत्याच्या घरातून 51 कोटी रुपये जप्त करण्यात आले होते. मला राहुलबाबा आणि अखिलेश यांना सांगायचं आहे की, तुम्ही भ्रष्टाचार केलात तर पकडले जाल आणि तुरुंगातही जाल. कोणीही थांबवू शकत नाही."
"2021 मध्ये अखिलेश यादव हरदोई येथे सरदार पटेल यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यासाठी आले होते आणि मोहम्मद अली जिना हे महान व्यक्ती होते असं म्हटलं होतं. अखिलेश यादव, इतिहासाचा नीट अभ्यास करा, भारतमातेचे तुकडे तुकडे करणारे दुसरे कोणी नसून तुमचे महान नेते मोहम्मद अली जिना होते."
"आत्ताच पाकिस्तानने राहुल बाबांची खूप प्रशंसा केली आहे. एका पत्रकाराने मला विचारलं की, पाकिस्तान राहुल गांधींची स्तुती का करत आहे? तर मी म्हणालो, सर्जिकल स्ट्राईक होतात, राहुल बाबा निषेध करतात. नक्षलवादी मरतात, राहुल बाबा विरोध करतात. राम मंदिर बांधलं, राहुल बाबा विरोध करतात. राहुल बाबा पाकिस्तानचा अजेंडा पुढे नेतात आणि पाकिस्तान राहुल यांचं समर्थन करतो" असं म्हणत अमित शाह यांनी टीकास्त्र सोडलं आहे.