यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएसमोर ४०० जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. विरोधी पक्षांकडून या लक्ष्याची पोकळ वल्गना म्हणून खिल्ली उडवत आहेत. तर काही जण याला भाजपाचा अतिआत्मविश्वास म्हणत आहेत. मात्र समोर येत असलेल्या काही खास आकडेवारीकडे पाहिल्यास नरेंद्र मोदींनी दिलेलं ४०० पारचं लक्ष्य हे कठीण असलं तरी अशक्य नसल्याचं दिसत आहे. तसेच भाजपा आणि एनडीए हे लक्ष्य गाठू शकतात, असं दिसून येत आहे. मात्र या मार्गामध्ये अनेक अडथळेही आहेत.
मोदीच्या अबकी बार ४०० पारवर विरोधकांकडून उपस्थित करण्यात येत असलेले प्रश्नही रास्त आहेत. एकीकडे इंडिया आघाडीमध्ये सुमारे २४ पक्ष समाविष्ट आहेत. तर दुसरीकडे एनडीएमध्ये एकट्या भाजपाने मागच्या वेळी ३०३ जागा जिंकल्या होत्या. अशा परिस्थितीत नरेंद्र मोदी हे भाजपाच्या ३०३ जागांना ३७० जागांपर्यंत आणि एनडीएला ४०० जागांपर्यंत घेऊन जाण्यात यशस्वी ठरणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ४० वर्षांपूर्वी राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने स्वबळावर ४०० हून अधिक जागा जिंकल्या होत्या. आता मोदींनी भाजपा आणि एनडीएसमोर ४०० हून अधिक जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. सद्यस्थितीत भाजपा आणि एनडीएला हे लक्ष्य गाठण्यासाठी ४ टक्के अधिक मतांची गरज आहे. ही अतिरिक्त मतं मिळवल्यास भाजपाचं ४०० पारचं लक्ष्य पूर्ण होऊ शकतं.
१९८४ मध्ये काँग्रेसने ४०० हून अधिक जागा जिंकल्या होत्या, तेव्हा कांग्रेसला ४९.१ टक्के मतं मिळाली होती. तर २०१९ मध्ये भाजपाने विजय मिळवला तेव्हा एनडीएला ४४.४८ टक्के मतं मिळाली होती. त्यात एकट्या भाजपाला ३७.३६ टक्के मतं मिळाली होती. म्हणजेच काँग्रेसला १९८४ मध्ये मिळालेल्या मतांपर्यंत पोहोचण्यासाठी एनडीएला ४.२६ टक्के मतांची आवश्यकता आहे. असं झाल्यास एनडीएला ४०० पार मजल मारता येईल.
मात्र हे तितकंस सोपं नाही याची मोदी आणि भाजपाला जाणीव आहे. हे शक्य होण्यासाठी देशभरात सरकारबाबत सकारात्मक वातावरण असणं आवश्यक आहे. १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येमुळे सहानुभूतीची लाट निर्माण झाली होती. त्यात काँग्रेस ४०० पार पोहोचली होती. यावेळी राम मंदिरामुळे आपल्या बाजूने वातावरण निर्माण होईल, अशी भाजपाला आशा आहे.