केंद्रातील मोदी सरकारविरोधात नेहमीच आक्रमक भूमिका घेणारे दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी महिलांना दिलेल्या एका अजब सल्ल्याची सध्या चर्चा सुरू आहे.तुमच्या पतींनी जर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं गुणगान केलं तर त्यांना जेवण वाढू नका, असा सल्ला अरविंद केजरीवाल यांनी महिलांना दिला आहे.
दिल्लीमध्ये महिला सन्मान समारंभामध्ये उपस्थितांना संबोधित करताना अरविंद केजरीवाल यांनी हा सल्ला दिला. ते म्हणाले की, बरेचसे लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाची जपमाळ ओढत आहेत. मात्र ही बाब तु्म्ही दुरुस्त केली पाहिजे. जर तुमचेही पती मोदी मोदी करत असतील, तर त्यांना रात्री जेवण मिळणार नाही, असं ठणकावून सांगा, असा सल्ला केजरीवाल यांनी दिला.
दिल्ली सरकारच्या २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात १८ वर्षांवरील सर्व महिलांना दरमहा एक हजार रुपये देण्याच्या करण्यात आलेल्या घोषणेनंतर महिलांशी संवाद साधण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महिलांनी त्यांच्या कुटुंबीयांना आम आदमी पक्षाला मत देऊ अशी शपथ घ्यायला लावावी, असं आवाहन अरविंद केजरीवाल यांनी महिलांना केलं. तसेच या महिलांनी भाजपाला पाठिंबा देणाऱ्या इतर महिलांनाही केवळ तुमचा भाऊ केजरीवालच तुमच्यासोबत उभा राहील, असं सांगण्यासही अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं.
आम आदमी पक्षाच्या सरकारने कशा प्रकारे वीज मोफत दिली आहे. बस प्रवासासाठी तिकीच मोफत केलं आहे. आता महिलांना दरमहा एक हजार रुपये देत आहे, भाजपाने काय दिलंय, मग भाजपाला मत का द्यावं? यावेळी केजरीवाल यांना मत द्या, हे या महिलांनी इतर महिलांना सांगावं, असं आवाहन अरविंद केजरीवाल यांनी केलं.