आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी चंदीगडमध्ये काँग्रेसचे उमेदवार मनीष तिवारी यांचा प्रचार केला आणि जनतेकडे मतं मागितली. जेलमध्ये असताना त्यांची औषधे बंद केल्याचा आरोपही त्यांनी केंद्रावर केला. चंदीगड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा मिळवण्यासाठी केजरीवाल यांनी रोड शो केला. काँग्रेस आणि आप चंदीगडमध्ये आघाडी करून लोकसभा निवडणूक लढवत आहेत.
अरविंद केजरीवाल म्हणाले की, ते आणि मनीष तिवारी हे चांगले मित्र आहेत. तुम्हाला चंदीगडमधून भाजपाचा पराभव करायचा आहे. तुम्ही किरण खेर यांना दोनदा निवडून दिलं, पण त्यांनी चेहरा तरी दाखवला का? यावेळी मनीष तिवारी यांना संधी द्या आणि त्यांना निवडून द्या, त्यांचे (काँग्रेसचे) निवडणूक चिन्ह पंजा आहे. त्यामुळे त्यांनाच मतदान करा. तसेच अच्छे दिन येणार, मोदीजी जाणार असंही सांगितलं.
"भाजपा 150 जागा पार करू शकणार नाही"
मनीष तिवारी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवडणूक प्रचारात सामील होण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठी चंदीगडला आल्याबद्दल त्यांचे आभार मानले. देश नव्या पहाटेची वाट पाहत आहे, असे सांगून ते म्हणाले की, 400 जागांची चर्चा करणारे 150 जागा पार करू शकणार नाहीत.
"माझं इन्सुलिनचं इंजेक्शन बंद केलं"
अरविंद केजरीवाल म्हणाले की, मोदी म्हणतात की अरविंद केजरीवाल भ्रष्ट आहेत. जर अरविंद केजरीवाल भ्रष्ट असतील तर या जगात कोणीही प्रामाणिक नाही. मोदींनी मला जेलमध्ये खूप तोडण्याचा प्रयत्न केला. त्यांनी माझी औषधं बंद केली. मी मधुमेही असून गेल्या दहा वर्षांपासून मी दिवसातून चार वेळा इन्सुलिनचं इंजेक्शन घेतो. मी जेलमध्ये असताना त्यांनी माझं इन्सुलिनचं इंजेक्शन बंद केलं, पण देशात ज्या प्रकारे हुकूमशाही आणि गुंडगिरी सुरू आहे, ती देशासाठी चांगली गोष्ट नाही.
"मोदीजी पंतप्रधान म्हणून परत येणार नाहीत"
मला प्रचार करण्यापासून रोखण्यासाठी तुरुंगात टाकण्यात आल्याचं अरविंद केजरीवाल म्हणाले. केजरीवालांनी प्रचार केला तर आपल्या जागा 20-30 ने कमी होतील असं त्यांना वाटत होतं. पण, सर्वोच्च न्यायालयाने मला प्रचाराची परवानगी दिली, असंही ले. जेलमधून बाहेर आल्यानंतर मी मुंबई, हरियाणा, लखनौ, जमशेदपूरला गेलो… मला तुम्हाला एक चांगली बातमी द्यायची आहे, मोदीजी पंतप्रधान म्हणून परत येणार नाहीत. अच्छे दिन येणार आहेत, मोदीजी जाणार आहेत असंही केजरीवालांनी म्हटलं आहे.