दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी लुधियाना येथील प्रचारसभेत बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. "ते (अमित शाह) सरकार पाडण्याची धमकी देत आहेत" असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
"देशामध्ये कोणत्या प्रकारची हुकूमशाही सुरू आहे, या लोकांनी पूर्ण गुंडगिरी निर्माण केली आहे. अमित शाह दोन दिवसांपूर्वी लुधियानात आले होते, त्यांनी काय सांगितलं ते तुम्ही ऐकलं आहे का? व्हिडीओ पाहिला आहे का? चार जूननंतर पंजाबचं सरकार संपणार आणि भगवंत मान यांनी मुख्यमंत्रीपदावरून हटवलं जाईल. पण ते हे कसं करणार? आमच्याकडे 117 पैकी 92 जागा आहेत."
"उघडपणे धमक्या देऊन ते निघून जात आहेत. गेल्या 75 वर्षात अशा गुंडगिरीबद्दल गृहमंत्री येऊन बोलल्याचं आठवत नाही. तीन कोटी पंजाबी लोकांनी सरकारला निवडून दिलं आहे आणि ते म्हणतात की ते सरकार आठवडाभरात बरखास्त करू, तुमच्या मुख्यमंत्र्यांना हटवू... ते कसं करणार? पंजाबी लोकांना किती किंमतीला विकत घेणार?, ईडी-सीबीआयकडे पाठवतील? ज्याप्रमाणे राष्ट्रवादी-शिवसेनेला फोडलं तसेच पंजाबमधील लोकांनाही फोडतील."
"अमित शाहजी, एवढे अहंकारी होऊ नका. पंजाबी लोकांचं मन मोठं असतं. प्रेमाने मागितलं असतं तर एखाद-दुसरी जागा दिली असती, पण धमकावलंत तर पंजाबी लोक त्यांचा शब्द राखतील आणि तुम्हाला पुढे अवघड होऊन जाईल" असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.
1 जून रोजी मतदान
पंजाबमधील लोकसभेच्या सर्व 13 जागांवर 1 जून रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी 30 मे रोजी प्रचार थांबणार आहे. येथे आम आदमी पार्टीची लढत काँग्रेस, भाजपा आणि अकाली दलाशी आहे. सध्या राज्यात 'आप'ची सत्ता आहे.