लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी ईडीने अटक केली होती. मात्र जवळपास ५२ दिवस तुरुंगात राहिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला होता. पण या जामिनाची मुदत आता संपूत असून, सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्याने अरविंद केजरीवाल यांना २ जून रोजी पुन्हा एकदा तुरुंगात जावं लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, दिल्लीमध्ये पुढील वर्षाच्या सुरुवातीला विधानसभेची निवडणूक होणार असून, त्या निवडणुकीवेळी अरविंद केजरीवाल हे तुरुंगात राहिल्यास आम आदमी पक्षासमोर मोठं आव्हान उभं राहू शकतं. यादरम्यान, विधानसभा निवडणुकीवेळी आपल्याला तुरुंगात ठेवल्यास आम आदमी पक्ष हा कुठलाही प्रचार न करता दिल्लीमधील ७० पैकी ७० जागांवर जिंकून येईल, असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला.
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा न देण्याच्या मुद्द्यावर सांगितलं की, मला कधीही पद किंवा खुर्चीचा मोह नव्हता. जेव्हा मी इन्कम टॅक्स विभागात कमिश्नर होतो. तेव्हा एका दिवसात नोकरीचा राजीनामा देऊन आलो होतो. त्यानंतर झोपडपट्ट्यांमधून काम काम केलं. त्यावेळी पक्ष स्थापन करायचा, निवडणूक लढवायची, अशी कुठलीही योजना नव्हती. पुणे अण्णांचं आंदोलन झालं. त्यानंतर पक्ष स्थापन केला, निवडणूक लढवून मुख्यमंत्री झालो, मुख्यमंत्री झाल्यानंतर ४९ दिवसांनी स्वत:च्या मूल्यांसाठी मी राजीनामा दिला. तेव्हा माझ्याकडे कुणी राजीनामा मागितला नव्हता. तर मी स्वत: खुर्चीला लाथ मारली होती,असं अरविंद केजरीवाल म्हणाले.
मात्र आज मी खुर्ची सोडत नाही आहे. कारण हा माझ्या संघर्षाचा भाग आहे. आम आदमी पक्षाला दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत पराभूत करू शकत नाही हे नरेंद्र मोदींना ठावूक आहे. आम्ही एकदा ६७ तर दुसऱ्यांदा ६२ जागा जिंकल्या. त्यामुळे त्यांनी आता नवा कट रचला. केजरीवाल यांना बनावट केसमध्ये अडचवायचं आणि अटक करायची.0 मत ते राजीनामा देतील आणि सरकार कोसळेल. मी जर आज राजीनामा दिला, तर हा प्रयोग आणखी काही राज्यांमध्ये केला जाईल. मग पुढचा नंबर ममता बॅनर्जींचा असेल. मग पिनराई विजयन यांचा नंबर लागेल. मग स्टॅलिन रांगेत असतील. त्यामुळे जोपर्यंत जामीन मिळत नाही तोपर्यंत तुरुंगातून सरकार चालवायचं, असं मॉडेल मी उभं केलं तर पुढे कुठल्याही मुख्यमंत्र्याला हात लावायची यांची हिंमत होणार नाही, असा दावा केजरीवाल यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, केजरीवाल यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवा, अशी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने असा कुठला कायदा नाही, त्यामुळे आम्ही त्यांना हटवू शकत नाही, असे सांगितले. आता मीच सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. तसेच मी तुरुंगात आहे. मुख्यमंत्री असल्याने मला माझी कर्तव्य पूर्ण करण्यासाठी अधिकार देण्यात यावेत. तसेच तुरुंगात सुविधा देण्यात याव्यात, ज्यामुळे मी जामीन मिळेपर्यंत मुख्यमंत्रिपदाच्या जबाबदाऱ्या पूर्ण करू शकेन, अशी मागणी करणार आहे.
दरम्यान, पुढील दिल्ली विधानसभा निवडणुकीबाबत अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की, जर यांनी मला दिल्लीच्या निवडणुकीवेळी तुरुंगात ठेवलं. तर कुठलाही प्रचार न करता आम आदमी पक्षाच्या ७० पैकी ७० जागा निवडून येतील. तसेच भाजपाला एकही जागा मिळणार नाही. जनता सगळं पाहत आहे. तसेच ती खूप समजूतदार आहे, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.