विनय उपासनी
मुंबई : गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (सी. आर. पाटील) यांचा हा लोकसभा मतदारसंघ. गेल्या वेळी या मतदारसंघातून पाटलांनी ऐतिहासिक असे ६ लाख ८९ हजारांचे विक्रमी मताधिक्य घेतले होते. यंदा ते आपलाच हा विक्रम मोडून नवा विक्रम घडवतात की कसे, हाच काय तो प्रश्न आहे. ते सलग तीनदा येथून खासदार म्हणून निवडून आले आहेत.
सी. आर. पाटील हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू सहकारी. गुजरात भाजपचे चाणक्य असेही त्यांना संबोधले जाते. ते किती मताधिक्याने जिंकतील, यावरच या ठिकाणी पैजा लागत आहेत. काँग्रेसने पाटील यांच्याविरोधात नैषाद देसाई यांना उभे केले आहे. दिवंगत पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या घराण्याशी संबंधित देसाई यांना स्वातंत्र्यसैनिक कुटुंबाचा वारसा लाभला आहे.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
निवडणूक तज्ज्ञ अशी सी. आर. पाटील यांची ख्याती आहे. अगदी बूथ पातळीपर्यंतचे सूक्ष्म नियोजन असते.
देसाई यांची स्थिती त्याउलट आहे. देसाईंना या मतदारसंघातून उमेदवारी देणे हे आत्मघात करण्यासारखे असल्याचे मत काँग्रेसी धुरिणांचे आहे.
नवसारीला मिनी इंडिया असेही संबोधले जाते. विविध राज्यातील लोक येथे येऊन विविध उद्योगव्यवसायासाठी स्थिरावलेले आहेत. त्यामुळे मतदारसंघ गुंगागुंतीचा झाला आहे.