लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखांची घोषणा लवकरच होणार आहे. मात्र निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. तृणमूल काँग्रेसचे दोन विद्यमान खासदार अर्जुन सिंह आणि दिव्येंदू अधिकारी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. या दोन्ही नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपाच्या मुख्यालयामध्ये झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये त्यांनी भाजपाचं पक्ष सदस्यत्व स्वीकारलं. यावेळी भाजपा नेते अमित मालवीय म्हणाले की, पश्चिम बंगाल आज सत्ता परिवर्तनासाठी उत्सुक आहे. त्यामुळेच अनेक नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत यायचं आहे. चांगले नेतेच चांगलं राजकारण देऊ शकतात.
यावेळी अर्जुन सिंह म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि अमित शाह यांचे मी आभार मानतो. पश्चिम बंगालमध्ये गुंडांच्या मदतीने सरकार टिकवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संदेशखालीच्या घटनेनंतर मी भाजपाशी संपर्क साधला. बंगालमध्ये या कुशासनापासून मुक्तता मिळवायची असेल तर एकमेव मार्ग आहे तो म्हणजे नरेंद्र मोदी हा आहे.
तर देवेंदू अधिकारी म्हणाले की, आज माझ्यासाठी शुभ दिवस आहे. आज मी भाजपाच्या कुटुंबाशी जोडला गेलो आहे. त्यासाठी मी नरेंद्र मोदी, अमित शाह आणि जे.पी. नड्डा यांचे आभार मानतो. आमचं लक्ष्य संदेशखाली असेल. संदेशखालीमध्ये जे काही घडलं, विशेषकरून महिलांसोबत जे काही घडलं तो केवळ बंगालचा नाही तर देशाचा विषय आहे. या निवडणुकीत मोदींना ४०० हून अधिक जागा जिंकून देण्यासाठी प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले.
अर्जुन सिंह यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून लढताना बेरकपूर लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. मात्र २०२२ मध्ये ते तृणमूल काँग्रेसमध्ये गेले होते. दरम्यान, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी ममता बॅनर्जी यांनी त्यांना उमेदवादी दिली नव्हती. त्यामुळे आता त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.