Lok Sabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सर्वच पक्ष लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. हिंदी हार्टलँड असलेल्या राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मिळालेल्या दणदणीत विजयानंतर भाजपनेही लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच भाजपकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर होण्यापूर्वीच पक्षाकडून उमेदवारांची घोषणा सुरू होईल. 22 जानेवारी रोजी भगवान श्रीरामाच्या प्रतिष्ठापणेनंतर भाजप लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार आहे.
विशेष म्हणजे, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्येही निवडणुका जाहीर होण्यापूर्वी भाजपने उमेदवारांची घोषणा करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे उमेदवारांना प्रचाराची संधी मिळते, असे पक्षाचे मत आहे. तीनही राज्यात भाजपला मोठा विजय मिळाल्याने त्याचा फायदा झाल्याचे मानले जात आहे.
पक्षाने दिला नारा मीडिया रिपोर्ट्सनुसार, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आपला नारादेखील तयार केला आहे. 'सपने नहीं हक़ीक़त बुनते हैं, इसलिए तो सब मोदी को चुनते हैं.''(स्वप्न नाही, वास्तविकता विणतो, म्हणूनच प्रत्येकजण मोदींना निवडतो.) असा नारा पक्षाकडून देण्यात येणार आहे.
भाजप नेत्यांची बैठकदिल्लीत आजपासून भाजप पदाधिकाऱ्यांची दोन दिवसीय बैठक सुरू होत आहे. या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदीही संबोधित करणार आहेत. त्यात संघटनेचे राष्ट्रीय प्रमुख, प्रदेश प्रभारी, सहप्रभारी, प्रदेशाध्यक्ष व प्रदेश सरचिटणीस उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला भाजपच्या सर्व आघाड्यांचे राष्ट्रीय अध्यक्षही उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत अनेक मुद्द्यांचा आढावा घेतला जाईल.