राजेंद्रकुमार
लखनौ : लैंगिक शोषणाचा आरोप असलेले भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने उमेदवारी दिलेली नाही. त्यांच्याऐवजी पक्षाने उत्तर प्रदेशातील केसरगंज लोकसभा मतदारसंघात त्यांचे पुत्र करणभूषण सिंह यांना भाजपने तिकीट जाहीर केले आहे.
केसरगंजमधून उमेदवारी मिळावी, यासाठी बृजभूषण यांनी बरेच प्रयत्न केले. मात्र, महिला कुस्तीपटूंनी त्यांच्यावर केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपामुळे बृजभूषण यांच्या नावाचा भाजप पक्षश्रेष्ठींनी उमेदवारीसाठी विचार केला नाही. त्यांना उमेदवारी दिल्यास लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या उमेदवारास तिकीट दिल्याची भाजपवर टीका झाली असती. या सर्व गोष्टींचा विचार करून बृजभूषण शरण सिंह यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्याऐवजी त्यांचा पुत्र करण भूषणसिंह याला निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे.
भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचा खटला दिल्लीच्या राऊज ॲव्हेन्यू न्यायालयात सुरू आहे. बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगट यांच्यासह आणखी काही कुस्तीगिरांनी बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता.
कोण आहेत करण भूषण सिंग?
करण भूषण हे राजकारणात प्रथमच पाऊल ठेवत आहेत. ३४ वर्षीय करण भूषण यांनी बीबीए व कायद्याचे शिक्षण घेतले आहे. त्यांचे मोठे भाऊ प्रतीकभूषण गोंडा सदर येथून दोनदा आमदार बनले आहेत.
करण भूषण हे ट्रॅप शूटिंगचे नावाजलेले खेळाडू आहेत. या क्रीडा प्रकारात उत्तर प्रदेशच्या स्टेट चॅम्पियनशीपमध्ये त्यांना सुवर्णपदक मिळाले होते. ते शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.