हरीश गुप्ता
नवी दिल्ली : भाजपने काही राज्यांमध्ये बहुतांश उमेदवार जाहीर केल्यानंतर आता लोकसभेचे तिकीट नाकारण्यात आलेल्या केंद्रीय मंत्र्यांची संख्या १२ झाली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सोम प्रकाश हे लोकसभेचे तिकीट नाकारण्यात आलेले १२ वे नेते ठरले आहेत.
पंजाबमधील होशियारपूर मतदारसंघातून ते विद्यमान खासदार आहेत. मात्र, त्यांच्या पत्नी अनिता सोम प्रकाश यांना तिकीट देण्यात आले आहे.
१९८८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी सोम प्रकाश यांनी पहिल्यांदा होशियारपूरमधून २००९ ची लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, ते पराभूत झाले होते. नंतर ते २०१७ मध्ये फगवाड्याचे आमदार झाले. पण, होशियारपूरमधून खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. उद्योग आणि वाणिज्य खात्याचे राज्यमंत्री म्हणून ते शेतकरी आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांमधील सर्व चर्चेत सहभागी होते. मात्र, त्यांच्या पत्नी अनिता सोम प्रकाश यांना तिकीट देण्यात आले आहे. तब्येत ठीक नाही आणि वयाची ७५ वर्षे पूर्ण झाल्याचे कारण सोम प्रकाश यांच्याबाबतीत देण्यात आले आहे.
या मंत्र्यांचे कापले तिकीट
राज्यसभा किंवा लोकसभेचे तिकीट नाकारलेल्यांच्या यादीत ११ जणांचा समावेश होता. व्ही. के. सिंग (गाझियाबाद), दर्शना जरदोश (सुरत), मीनाक्षी लेखी (नवी दिल्ली), प्रतिमा भूमिक (त्रिपुरा पश्चिम), राजकुमार रंजन सिंग (इनर मणिपूर), जॉन बार्ला (अलिपूरद्वार, पश्चिम बंगाल), एम मांजपारा (सुरेंद्रनगर, गुजरात), बिश्वेश्वर तुडू (मयूरभंज, ओडिशा), रामेश्वर तेली (दिब्रुगड, आसाम), ए नारायणस्वामी (चित्रदुर्ग, कर्नाटक) आणि अश्विनी चौबे (बक्सर, बिहार) यांचा यात समावेश आहे.
या मंत्र्यांना मिळाले तिकीट
११ केंद्रीय मंत्र्यांना लोकसभेची तिकिटे देण्यात आली आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालावर त्यांचे भवितव्य अवलंबून असेल. यात पीयूष गोयल (मुंबई उत्तर), ज्योतिरादित्य शिंदे (गुना), धर्मेंद्र प्रधान (संबलपूर), व्ही. मुरलीधरन (अटिंगल), भूपेंद्र यादव (अलवर, राजस्थान), पुरुषोत्तम रूपाला (राजकोट), मनसुख मांडविया, राजीव चंद्रशेखर, सर्बानंद सोनोवाल, एल. मुरुगन (निलगिरी) आणि नारायण राणे (रत्नागिरी) यांचा समावेश आहे.