Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष एक एक करत आपल्या उमेदवारांची नावे जाहीर करत आहेत. भारतीय जनता पक्षाने आतापर्यंत 6 याद्या जाहीर केल्या आहेत, ज्यात एकूण 405 उमेदवारांची नावे समोर आली आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे, पक्षाने विद्यमान 291 खासदारांपैकी 101 खासदारांची तिकिटे कापली आहेत. भाजपने पहिल्या यादीत 33, दुसऱ्या यादीत 30, पाचव्या यादीत 37, तर सहाव्या यादीत एका खासदाराचे तिकिट कापले आहे. यामध्ये अनेक मंत्र्यांचाही समावेश आहे.
भाजपने ज्या बड्या खासदारांची तिकिटे कापली, त्यात वरुण गांधी, प्रज्ञा ठाकूर, रमेश बिधुरी, दर्शना जरदोश, रमेश पोखरियाल निशंक, प्रताप सिम्हा, व्हीके सिंह, अनंत हेगडे, अश्विनी चौबे, हर्षवर्धन, गौतम गंभीर यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. पक्षाने मणिपूरच्या तिन्ही खासदारांची तिकिटे कापली आहेत. मणिपूरमधील सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला.
आकडेवारीवर नजर टाकली, तर भाजपने आतापर्यंत जवळपास 34 टक्के खासदारांना डच्चू दिला आहे. विशेष बाब म्हणझे, 2019 मध्येही भाजपने आपल्या तत्कालीन 282 खासदारांपैकी 119 खासदारांची तिकिटे कापली होती. म्हणजेच त्यावेळी सुमारे 42 टक्के खासदारांना पुन्हा तिकीट मिळाले नव्हते. सत्ताविरोधी लाट टाळण्यासाठी भाजपने हे पाऊल उचलले होते. यावेळी सत्ताविरोधी लाट, वादग्रस्त वक्तव्ये आणि स्थानिक कार्यकर्त्यांची नाराजी लक्षात घेऊन पक्षाने आतापर्यंत 101 खासदारांची तिकिटे कापली आहेत.
आणखी खासदारांची तिकिटे कापली जाणारभाजप आणखी किमान 30-40 उमेदवार जाहीर करणार असून यापैकी अनेक विद्यमान खासदारांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, वादग्रस्त खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या उमेदवारीबाबत पक्षाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. पक्षाने अद्याप कैसरगंज लोकसभा मतदारसंघातून नाव जाहीर केला नाही. यावेळी ब्रिजभूषण सिंह यांचे तिकीट कापले जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, याबाबत अद्यापही सस्पेंस कायम आहे.