लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच नेत्यांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. याच दरम्यान, माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचा बालेकिल्ला असलेल्या छिंदवाडा येथील भाजपाच्या विजयाची जबाबदारी पक्षाच्या हायकमांडने ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांच्याकडे सोपवली आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी विजयवर्गीय छिंदवाडा येथे पोहोचले आहेत.
कैलाश विजयवर्गीय यांनी मंगळवारी छिंदवाडा येथे भाजपा उमेदवार विवेक बंटी साहू यांच्या समर्थनार्थ जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि छिंदवाडा येथील खासदार कमलनाथ आणि त्यांचा काँग्रेस पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. याशिवाय त्यांनी कमलनाथ यांच्या भाजपामध्ये प्रवेश केल्याच्या वृत्तावर देखील टोला लगावला. ते म्हणाले की, काही लोकांना भाजपामध्ये प्रवेश करायचा होता पण आम्ही त्यांच्यासाठी दरवाजे बंद केले.
विजयवर्गीय म्हणाले की, "छिंदवाड्यात विकास होऊ शकतो. इथे फक्त एकच कुटुंब जिंकतं पण जो विकास इथे व्हायला हवा होता तो झालेला नाही. त्यामुळेच या मातीच्या सुपुत्राला नेतृत्व मिळणे खूप गरजेचे आहे. आज आम्ही येथे निवडणुकीचा शंख फुंकला आहे. हे करत असताना येथून भाजपाचे उमेदवार विवेक बंटी साहू यांना पाठिंबा मिळवण्यासाठी सभा घेण्यात आली आहे.
मध्य प्रदेशचे मंत्री कैलाश विजयवर्गीय पुढे म्हणाले की, "भाजपामध्ये सामील होण्यासाठी अनेक लोक विमान आणि हेलिकॉप्टरने येत होते, पण आम्ही दरवाजे बंद केले. तुम्ही गरीब, आदिवासी आणि मागासवर्गीय लोकांसह हजारो लोकांना भाजपामध्ये सामील होताना पाहिले. भाजपाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबी हटवण्याची योजना राबवून 25 कोटी लोकांना दारिद्र्यरेषेच्या वर आणले."
"नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यावर गरिबांसाठी इतक्या योजना आणतील की गरिबी हा शब्दच डिक्शनरीतून गायब होईल." काँग्रेसने छिंदवाडामधून कमलनाथ यांचा मुलगा नकुलनाथ यांना उमेदवारी दिली आहे, तर भाजपाने विवेक बंटी साहू यांना या उमेदवारी दिली आहे.