केरळ भाजपाचे अध्यक्ष आणि वायनाड मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार के सुरेंद्रन यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. "राहुल गांधी यावेळी वायनाडमधून लोकसभा निवडणूक हरत आहेत कारण ते येथे टूरिस्ट व्हिसावर येत आहेत" असा खोचक टोला लगावला आहे.
के सुरेंद्रन यांनी एनडीटीव्हीशी संवाद साधला, त्यावेळी बोलताना ते म्हणाले की, "राहुल गांधी देशभर आणि परदेशात फिरतात. ते वायनाडला टूरिस्ट व्हिसावर येतात, पण मी येथील स्थानिक नागरिक आहे आणि माझ्याकडे पर्मनंट व्हिसा आहे."
"वायनाडच्या लोकांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांना संधी दिली, पण त्यांनी काहीही केलं नाही. वायनाडचे लोक राहुल गांधींना आता कंटाळले आहेत. अशा स्थितीत ते यावेळी जिंकणार नाहीत" असा दावा के सुरेंद्रन यांनी केला आहे.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी अमेठी आणि वायनाडमधून निवडणूक लढवली होती. ते अमेठीमधून स्मृती इराणी यांच्याकडून पराभूत झाले होते, परंतु वायनाडमधून त्यांनी मोठा विजय नोंदवला होता. यावेळीही काँग्रेसने राहुल गांधी यांना वायनाडमधून उमेदवारी दिली आहे.
के सुरेंद्रन यांनी राहुल गांधींवर निशाणा साधत ते बेजबाबदार खासदार असल्याचं म्हटलं आहे. राहुल गांधी वायनाडमध्ये किती वेळा आले आणि इथे काय विकास झाला. वायनाडमधील 20 टक्के लोक अनुसूचित जमाती (ST) श्रेणीतील आहेत. राहुल गांधी यांनी त्यांच्यासाठी काय केलं? असा सवाल विचारला आहे.