नवी दिल्ली - Rajnath Singh on Emergency ( Marathi News ) माझ्या आईला ब्रेन हॅमरेज झालं होतं, तेव्हा काँग्रेस सरकारनं मला पेरोलही दिली नव्हती. मला माझ्या आईच्या अंत्ययात्रेलाही जाता आलं नव्हतं. २७ दिवस माझी आई हॉस्पिटलमध्ये होती आणि मी जेलमध्ये होतो. अखेरच्या काळात आईला पाहूही शकलो नाही असं सांगताना राजनाथ सिंह भावूक झाले. एका मुलाखतीत आणीबाणीचा काळ आठवताना राजनाथ सिंह यांनी हे उत्तर दिलं.
राजनाथ सिंह म्हणाले की, ज्या लोकांनी आणीबाणी लावून हुकुमशाही केली ते आज आमच्यावर हुकुमशाहीचा आरोप लावतायेत. आणीबाणीविरोधात आम्ही लोकांमध्ये आवाज उचलत होतो, त्यामुळे आम्हाला जेलमध्ये टाकलं गेले. २७ दिवस आई वाराणसीच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती. तरीही मला तिला भेटू दिलं नव्हतं. आईच्या निधनानंतर तिच्या अंत्यविधीलाही मला जावू दिले नाही असं त्यांनी म्हटलं.
...तर भारत पाकिस्तानची मदत करण्यास तयार
आगामी लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. त्यात देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हेदेखील प्रचारावेळी चीन आणि पाकिस्तान यांच्यावर निशाणा साधत आहेत. त्यात दहशतवादाच्या मुद्द्यावरून राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला मदतीची ऑफर दिली आहे. ANI न्यूजला दिलेल्या मुलाखतीत राजनाथ यांनी जर पाकिस्तान दहशतवाद्यांशी लढण्यात असक्षम असेल तर भारत दहशतवाद रोखण्यासाठी त्यांची मदत करायला तयार आहे असं मोठं विधान त्यांनी केले आहे.राजनाथ सिंह म्हणाले की, पाकिस्तान जर दहशतवादाचा आधार घेत भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला सडेतोड उत्तर दिले जाईल. पाकिस्ताननं दहशतवादावर नियंत्रण मिळवावं. पाकिस्तान जर दहशतवादावर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरत असेल तर शेजारील देश भारताची मदत घेऊ शकते. दहशतवाद थांबवण्यासाठी भारत पाकिस्तानची मदत करण्यास तयार आहे असं त्यांनी म्हटलं.
चीनवर थेट निशाणा
जर भारतानं चीनच्या प्रदेशांची नावे बदलली त्याचा अर्थ तो भाग भारताचा बनला असं होत नाही. अरुणाचलमध्ये नामसाई परिसरात एका निवडणूक रॅलीत राजनाथ सिंह यांनी चीनला फटकारत जमिनीवरील वस्तूस्थिती बदलणार नसल्याचं स्पष्ट केले. जोपर्यंत देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार आहे तोपर्यंत देशातील जमिनीचा एक इंचही कब्जा करू शकणार नाही. पीओके आमचे होते आणि ते कायम राहील असं राजनाथ यांनी ठणकावलं.