नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील लोकसभेच्या जागांवाटबाबत भाजपाचा (BJP) अद्याप तिढा सुटला नाही. राज्यातील लोकसभेच्या 80 जागांपैकी भाजपाने 51 जागांसाठी आधीच उमेदवार निश्चित केले आहेत. याशिवाय, एनडीएमध्ये समाविष्ट असलेल्या पक्षांना भाजपा 6 जागा देत आहे. अशा परिस्थितीत आता 23 जागांवर भाजपाची चर्चा सुरू आहे.
दरम्यान, कैसरगंजचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या नावाची चर्चा आहे. याचबरोबर, देवरिया, बलिया, गाझीपूर, मेरठ, गाझियाबाद, रायबरेली या लोकसभा जागांसाठी उमेदवार निवडण्याची प्रक्रियाही सुरू आहे. भाजपाची आज नवी दिल्लीत बैठक होणार आहे. बैठकीनंतर भाजपा दुसरी यादी जाहीर करू शकते.
कैसरगंज लोकसभा मतदारसंघातील भाजपा खासदार ब्रिजभूषण शरण सिंह गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. महिला कुस्तीपटूंनी त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. एवढेच नाही तर नाराज कुस्तीपटूंनी त्यांच्या विरोधात आंदोलनही केले होते. कुस्तीपटूंच्या आरोपानंतर ब्रिजभूषण शरण सिंह यांना तिटिक देण्यात अडचणी निर्माण झाल्या तर त्यांची पत्नी केतकी देवी किंवा मुलगा प्रतीक भूषण सिंग यांना तिकीट मिळू शकते.
अनेक जागांवर उमेदवार बदलण्याची शक्यताउरलेल्या अनेक जागांवर भाजपा गेल्या निवडणुकीत विजयी झालेले उमेदवार बदलू शकते, अशीही चर्चा आहे. यामध्ये रायबरेली, पिलीभीत आणि सुल्तानपूर या जागांचा समावेश आहे. सध्याच्या खासदार मनेका गांधी आणि त्यांचे पुत्र वरुण गांधी यांच्याबाबत भाजपा काय निर्णय घेते, यावर सुल्तानपूर आणि पिलीभीतमधील उमेदवारांची निवड अवलंबून असणार आहे. तर देवरियामध्ये रमापती राम त्रिपाठी यांचे तिकीट कापले जाऊ शकते. त्याचवेळी बलियामध्ये वीरेंद्र सिंह मस्त यांच्या संदर्भात स्थानिक नेत्यांमध्ये नाराजी आहे.
पहिल्या यादीत दिग्गज नेत्यांना तिकीट!भाजपाने नुकतेच लोकसभेच्या १९५ जागांसाठी उमेदवार जाहीर केले होते. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि राजनाथ सिंह यांसारख्या नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा वाराणसीतून निवडणूक लढवणार आहेत. त्याचवेळी गृहमंत्री अमित शाह पुन्हा एकदा गुजरातच्या गांधीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. याशिवाय, स्मृती इराणी यांना तिसऱ्यांदा अमेठीतून तिकीट मिळाले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लखनौमधून निवडणूक लढवणार आहेत.