राजेश शेगोकार
पाटणा : बिहारमध्ये तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान होणार आहे. आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण तापले आहे. मात्र, निवडणुकीच्या वातावरणात संपूर्ण बिहारमध्ये लालूंच्या दाेन्ही कन्या अन् नऊ दलबदलू उमेदवारांचे काय हाेणार, याचीच चर्चा अधिक आहे.
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
भाजपचे खासदार अजय निषाद यांनी ज्यांचा पराभव केला त्या राजभूषण निषाद यांनाच भाजपाने उमेदवारी दिली, त्यामुळे अजय निषाद यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला असून आता ते मुजफ्फरपूरमध्ये भाजपविरोधात लढत आहेत. राजभूषण निषाद यांनीही विकासशील इंसान पार्टी (वीआईपी) साेडली आहे. बीमा भारती यांनी जेडीयू साेडून राजदमध्ये प्रवेश केला. त्यांना पुर्णियामधून उमेदवारी दिली असून ही जागा पप्पू यादवांच्या बंडखाेरीने लक्षवेधी ठरली आहे. लवली आनंद यांनी राजदशी संबंध तोडून जेडीयूच्या तिकिटावर शिवहरमधून उमेदवारी मिळविली. सनी पासवान हे जेडीयू मंत्री महेश्वर हजारी यांचे पुत्र आहेत. ते काँग्रेसच्या तिकिटावर समस्तीपूर येथून लढत आहेत. जेडीयूचे माजी मंत्री अली अशरफ फातमी यांनी राजदमध्ये घरवापसी केली असून ते मधुबनी येथून रिंगणात आहेत.
मिसा अन् राेहणीचे काय?
लालुप्रसाद यांच्या ज्येष्ठ कन्या राज्यसभेच्या खासदार मिसा भारती पाटलीपुत्र मतदारसंघात लढत आहेत. दाेन वेळा पराभूत झाल्यानंतर आता पुन्हा त्यांचा सामना सलग तिसऱ्यांदा भाजपाचे रामकृपाल यादव यांच्याशी आहे. लालूंना किडनी देणाऱ्या राेहिणी आचार्य या थेट सिंगापूरवरून येत सारणमध्ये भाजपचे राजीव प्रताप रूडी यांना आव्हान देत आहेत.
सिमांचलमधील ध्रुवीकरण
झंझारपूर, सुपौल, अररिया, मधेपुरा खगडिया या तिसऱ्या टप्प्यातील जागांपैकी अररिया ही एकमेव जागा भाजप लढत असून उर्वरित चार मतदारसंघात जेडीयूचे उमेदवार आहेत.
या पाच जागांचे समीकरण हे धार्मिक ध्रुवीकरणामुळे बदलते, त्यामुळे भाजपाने येथे काँग्रेसच्या तुष्टीकरणावर हल्ला करण्याची रणनीती आखली आहे.
सिमांचल भागासह बिहारमधील १७ मतदारसंघात मुस्लीम मतांची संख्या निर्णायक आहे. त्यामुळे येथील मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न एनडीएचा आहे. दुसरीकडे राजद व काँग्रेसचाही या मतांवर डाेळा आहे.