आंध्र प्रदेशमध्ये आज विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या मतदानादरम्यान एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका मतदान केंद्रावर एका तरुणाला मारहाण करणं वायएसआर काँग्रेसच्या आमदाराला चांगलंच महागात पडलं. गुंटूरमधील एका मतदान केंद्रामध्ये रांगेत घुसण्यावर आक्षेप घेण्यात आल्यानंतर कथितपणे एका मतदाराला मारहाण केली. त्यानंतर मारहाण झालेल्या तरुणानेही आमदारांना फटका दिला. आता या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओमध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआर काँग्रेस पक्षाचे आमदार ए. शिवकुमार हे मतदाराच्या दिशेने झेपावताना आणि त्याच्या तोंडावर हात उगारताना दिसत आहेत. त्यानंतर मतदारानेही आमदारांवर प्रत्युत्तरादाखल हात उगारला. त्यानंतर आमदारांचे समर्थकही मतदारावर तुटून पडल्याचे दिसत आहे.
दरम्यान, तिथे असलेल्या इतर मतदारांनी मध्ये पडून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र आमदारांचे कार्यकर्ते त्या मतदाराला बेदम मारहाण करत राहिले. आंध्र प्रदेशमध्ये आज लोकसभेच्या २५ आणि विधानसभेच्या १७५ मतदारसंघांत आज मतदान होत आहे. आंध्र प्रदेशमध्ये यावर्षी जगनमोहन रेड्डी यांची वायएसआर काँग्रेस विरुद्ध तेलुगू देसम आणि भाजपा यांची आघाडी यांच्यात मुख्य लढत होत आहे.