रुद्रपूर (उत्तराखंड) : विरोधी पक्ष भ्रष्टाचाराला संरक्षण देत असल्याचा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीनंतरच्या तिसऱ्या कार्यकाळात भ्रष्टाचारावरील हल्ला अधिक तीव्र होईल, असे निक्षून सांगितले. देशात प्रथमच भ्रष्टाचारी नेते एकत्र येऊन भ्रष्टाचाराविरुद्धची कारवाई रोखण्यासाठी प्रचार करत आहेत, अशी टीका त्यांनी जाहीरसभेत केली.
उत्तराखंडमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करताना येथील ‘विजय शंखनाद’ जाहीरसभेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, ‘तिसऱ्या कार्यकाळात भ्रष्टाचारावर जोरदार हल्ला चढवला जाईल, याची गॅरंटी देण्यासाठी मी येथे आलो आहे. भ्रष्टाचार गरिबांचे, मध्यमवर्गीयांचे हक्क हिरावून घेतो आणि मी ते हिरावू देणार नाही.’
मोदी म्हणाले...- भाजप ‘राष्ट्र प्रथम’ची शपथ घेतो, तर काँग्रेस पक्ष देशाला लुटण्याची संधी शोधत आहे. काँग्रेसच्या काळात भारत हा जगातील सर्वात मोठा शस्त्र आयात करणारा देश म्हणून ओळखला जात होता, आज तो शस्त्र निर्यात करणारा देश आहे.
निवडणूक भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी- राजस्थानमधील कोटपुतली येथील जाहीरसभेत मोदी म्हणाले की, भ्रष्टाचाराविरुद्धची कारवाई थांबवण्यासाठी पहिल्यांदाच सर्व भ्रष्टाचारी एकत्र येऊन लोकसभेचा प्रचार करत आहेत.- ही निवडणूक भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी केलेला संकल्प आहे.
सत्तेबाहेर राहताच आग लावण्याची भाषाविरोधकांवर निशाणा साधत ते म्हणाले की, ‘इंडिया’ आघाडीचा भाग असलेल्या काँग्रेसच्या राजघराण्यातील राजपुत्राने देशात तिसऱ्यांदा भाजपचे सरकार निवडून आल्यास आगडोंब उसळेल, असा इशारा दिला आहे. ज्यांनी ६० वर्षे देशावर राज्य केले ते १० वर्षे सत्तेबाहेर राहताच देशाला आग लावण्याची भाषा करत आहेत. आणीबाणीच्या गप्पा मारणाऱ्या काँग्रेसचा लोकशाहीवर विश्वास नाही आणि त्यामुळे ते लोकांना भडकवण्यात व्यस्त आहेत.