Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या दोन टप्प्यात देशातील एकूण 190 जागांवर मतदान झाले आहे. पण, अद्याप अशा काही जागा आहेत, ज्यावर पक्षांनी आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. अशाच जागांमध्ये उत्तर प्रदेशातील अमेठी आणि रायबरेली लोकसभा मतदारसंघ आहे. उद्या, म्हणजेच शनिवारी काँग्रेस निवडणूक समितीची बैठक होत आहे. या बैठकीत अमेठी आणि रायबरेली जागांसाठी उमेदवारांच्या नावांबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे.
अमेठी आणि रायबरेलीसाठी 26 एप्रिलपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता अमेठीतून राहुल गांधी आणि रायबरेलीतून प्रियांका गांधी निवडणूक लढवण्याबाबत निर्णय होणार असल्याचे मानले जात आहे. त्यामुळेच पक्षाने अद्याप अमेठी आणि रायबरेलीच्या उमेदवारांची नावे जाहीर केलेली नाहीत. मात्र, शनिवारी सायंकाळी होणाऱ्या बैठकीत काय निर्णय होतो, हे पाहणे महत्वाचे ठरेल.
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या राज्य निवडणूक समितीने अमेठीतून राहुल गांधी आणि रायबरेलीमधून प्रियांका गांधी यांच्या नावाचा प्रस्ताव दिला आहे. समितीने हा प्रस्ताव निवडणूक समितीकडे पाठवला होता. यानंतर निवडणूक समितीने अंतिम निर्णय गांधी कुटुंबावर सोपवला आहे. अशा स्थितीत काँग्रेस येत्या एक-दोन दिवसांत या दोन जागांवर उमेदवारांची नावे जाहीर करू शकते.