बंगळुरू : लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील १४ मतदारसंघांमध्ये दुष्काळाची तीव्रता प्रखरतेने जाणवत आहे. मात्र, दिग्गज नेत्यांच्या सभांमधील आराेप-प्रत्याराेपांनी राजकीय वातावरण दुष्काळापेक्षाही अधिक तापविले आहे. यातून केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार अशी जुंपली असल्याचे चित्र आहे.
कर्नाटकात दुसऱ्या टप्प्यातील १४ मतदारसंघ मतदारसंघ उत्तर कर्नाटकात येतात. तेथे लिंगायत समाजाचे वर्चस्व आहे शिवाय धनगर, दलित आणि मुस्लिम मतांचे प्रमाण चांगले आहे. या भागात लिंगायत समाजाच्या पाठिंब्यामुळे भाजपचे नेहमीच वर्चस्व असते. मात्र, यावेळी लिंगायत समाजाची नाराजी भाजपने ओढवून घेतल्याचे चित्र आहे.
दिग्गज नेत्यांचा प्रचार
दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा आदींच्या दौऱ्याने प्रचाराचा धुरळा उडविला असून राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.