Cm Arvind Kejriwal ( Marathi News ) : देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. १ जून रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार असून ४ जून रोजी निवडणुकांचे निकाल समोर येणार आहेत. इंडिया आघाडी तसेच एनडीच्या जोरदार सभा सुरू आहेत. इंडिया आघाडीला आम आमदी पक्षानेही पाठिंबा दिला आहे. दरम्यान, निकालावरुन अनेक नेत्यांनी दावे केले आहेत. आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 'इंडिया टुडेला' दिलेल्या मुलाखतीत निकालावरुन तसेच काँग्रेससोबत केलेल्या आघाडीवरुन वक्तव्य केले आहे. यावरुन राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.
बिहारमध्ये उष्णतेचा कहर, शाळेतील ४८ विद्यार्थिनी पडल्या बेशुद्ध, रुग्णालयात करावं लागलं दाखल
यावेळी सीएम केजरीवाल यांनी भाजपावर निशाणा साधला. केजरीवाल पंजाबमधील लोकसभा निवडणुकीपर्यंत सर्वच गोष्टींवर भाष्य केले.यावेळी केजरीवाल यांना आम आदमी पक्षाची काँग्रेससोबतची युती किती दिवस टिकणार? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले, आम्ही लग्न केलेले नाही. आमचे लग्न झालेले नाही. अरेंज मॅरेजही झालेले नाही, प्रेमविवाह झाला नाही. देश वाचवण्यासाठी ४ जूनपर्यंत निवडणूक लढण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. त्याला नाव देण्याची काय गरज आहे? भाजपला पराभूत करणे हे सध्या आमचे ध्येय आहे, असंही केजरीवाल म्हणाले.
काँग्रेससोबत दिल्ली-चंदीगड आणि पंजाबमध्ये वेगळी निवडणूक लढवण्याच्या प्रश्नावर केजरीवाल म्हणाले, यावेळी देश वाचवणे आवश्यक आहे. भाजपचा पराभव करण्यासाठी जिथे एकत्र यावे लागले तिथे आम्ही एकत्र आलो. जेणेकरून भाजपच्या विरोधात उमेदवार देता येईल. पंजाबमध्ये भाजपचे अस्तित्व नाही. त्यामुळे पंजाबमध्ये आम्ही वेगळे लढत आहोत. ४ जूननंतर पुढे काय करायचे ते ठरवू. यावेळी देशाचे संविधान व लोकशाही वाचवणे गरजेचे आहे. जनतेने आमच्या निर्णयाचे स्वागत केले आहे, असंही केजरीवाल म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत आप आणि काँग्रेसने दिल्लीतील सातही जागांवर युती करुन निवडणूक लढवली. चंदीगडमध्येही आप- काँग्रेसचे उमेदवार मनीष तिवारी यांना पाठिंबा देत आहे. मात्र,पंजाब राज्यात दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवत आहेत.
'मी घाबरणार नाही'
अरविंद केजरीवाल म्हणाले, मी घाबरणार नाही आणि दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही. पुन्हा तुरुंगात जाणे माझ्यासाठी मुद्दा नाही नाही. या देशाचे भवितव्य पणाला लागले आहे. त्यांना वाटेल तेव्हा ते मला तुरुंगात टाकू शकतात, मी घाबरणार नाही. भाजपला हेच हवे आहे, त्यामुळे दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही, असंही सीएम केजरीवाल म्हणाले.