भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनचा कब्जा, केंद्र सरकारचं मौन, शशी थरूर यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 08:07 PM2024-05-24T20:07:03+5:302024-05-24T20:08:27+5:30
Lok Sabha Election 2024: भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनने कब्जा केला असून, केंद्र सरकार त्यावर काहीच बोलत नाही आहे, असा सनसनाटी आरोप काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी केला आहे. तसेच यंदाच्या निवडणुकीत बालाकोटसारखी कुठलीही परिस्थिती नाही आहे, असा दावाही शशी थरूर (ShaShi Tharoor) यांनी केला आहे.
भारताच्या अनेक चेक पॉईंटवर चीनने कब्जा केला असून, केंद्र सरकार त्यावर काहीच बोलत नाही आहे, असा सनसनाटी आरोप काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी केला आहे. तसेच यंदाच्या निवडणुकीत बालाकोटसारखी कुठलीही परिस्थिती नाही आहे, असा दावाही शशी थरूर यांनी केला आहे.
बिहारची राजधानी पाटणा येथे काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयामध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शशी थरूर म्हणाले की, आता बदल घडवण्याची वेळ आली आहे. ४ जून रोजी दिल्लीमध्ये बदल दिसेल, हे आता स्पष्ट झाले आहे. बिहारमध्ये ३९ जागा जिंकल्यावरही कोरोना काळात कुठलीही मदत मिळाली नाही. आता देशात बदल घडवण्यासाठी महाआघाडीला विजयी करा, असं आवाहन शशी थरूर यांनी केलं.
ते पुढे म्हणाले की, आता कशा भारतात राहायचं हे तुम्ही ठरवा. पाटणा येथे सेंट्रल युनिव्हर्सिटी बनवण्यात आली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ चांगली भाषणं देतात. पण कुठल्या समस्येचं निराकरण करत नाहीत. मागच्या पाच टप्प्यातील मतदानातून बिहारमध्येही बदल होण्याचे संकेत मिळत आहेत, असा विश्वासही शशी थरूर यांनी व्यक्त केला.
दरम्यान, काँग्रेसचे स्टार प्रचारक बिहारमध्ये प्रचारासाठी आले नाहीत, तसेच येथील प्रचाराची सगळी धुरा तेजस्वी यादव यांच्यावर सोपवण्यात आली. याबाबत विचारले असता शशी थरूर म्हणाले की, आम्ही भाऊ आहोत. एक भाऊ एकीकडे प्रचार करत आहे, तर दुसरा दुसरीकडे प्रचार करत आहे. अशाप्रकारे दोघेही एकत्र येऊन प्रचार करत आहेत, असं स्पष्टीकरण शशी थरूर यांनी दिलं.