कोलकाता - पश्चिम बंगालच्या नंदीग्राम इथं भाजपा आणि तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांच्या झटापटीत एका भाजपा महिला कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. त्याशिवाय ७ भाजपा कार्यकर्ते जखमी झाले. ही घटना २२ मे च्या रात्री नंदीग्रामच्या सोनचूरा भागात घडली. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी धारदार शस्त्राने भाजपा कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्रीय सुरक्षा दल तैनात करण्यात आलं आहे.
या हिंसक घटनेत महिला कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्यानं भाजपाही आक्रमक झाली आहे. या घटनेविरोधात नंदीग्राम इथं भाजपा कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. भाजपा कार्यकर्त्यांनी टायर जाळून रस्त्यावर फेकली. नंदीग्राम येथील अल्पसंख्याक बहुल भागात मतदानाच्या दिवशी केंद्रीय सुरक्षा दल तैनात करावं अशी मागणी भाजपानं केली. तर संबंधित हिसाचाराच्या घटनेतील दोषींवर कारवाई करू असं आश्वासन पोलिसांनी आंदोलक कार्यकर्त्यांना दिले.
या घटनेचं गांभीर्य पाहता केंद्रीय सुरक्षा दलाला परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्जही करावा लागला. घटनेत सोनचूरा भागातील एका दुकानाला आग लावण्यात आली. त्याशिवाय अनेक दुकानांची तोडफोड झाली. टीएमसी समर्थकाचे दुकाने जाळल्याचा भाजपावर आरोप आहे. या घटनेनंतर भाजपा नेते शुभेंद्रु अधिकारी यांनी म्हटलं की, टीएमसीनं एससी समुदायातील ५६ वर्षीय महिलेची हत्या केली. तिच्या मुलालाही मारले. मी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मतदानाच्या दिवशीही असाच प्रकार घडण्याची शक्यता पाहता केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान तैनात करावेत असं त्यांनी मागणी केली.
तर भाजपाची अंतर्गत लढाई असून त्यातूनच एका महिलेला मारण्यात आलं. त्यानंतर त्याचा आरोप टीएमसीवर लावला जात आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव होतोय त्यासाठी लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी अशाप्रकारचे आरोप केले जात आहेत असा पलटवार टीएमसी नेते सांतनु सेन यांनी भाजपावर केला. नंदीग्राममधील हिंसाचार हा टीएमसी नेते अभिषेक बॅनर्जी यांच्या चिथावणीखोर विधानामुळे झाला असा आरोप भाजपाने केला आहे.
२००७ मध्ये झाला होता १४ जणांचा मृत्यू
नंदीग्राम येथे १४ मार्च २००७ मध्ये पोलिसांच्या गोळीबारात १४ जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी वाममोर्चा सरकारने विशेष कायद्यानुसार जमीन अधिग्रहण केले जात होते. त्याला स्थानिकांनी विरोध केला होता. त्या विरोधात ममता बॅनर्जी पुढे होत्या. या मोर्चानं हिंसक वळण घेताच पोलिसांनी गोळीबार केला. त्यात १४ मृत्यूमुखी पडले. या घटनेचा फायदा ममता बॅनर्जी यांना झाला आणि त्यांनी हळूहळू सत्तेच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले.