दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज पंजाबमधील भटिंडा येथे 1125 कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ केला. केजरीवाल येथे 'विकास क्रांती रॅली'त सहभागी झाले होते. यावेळी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे देखील केजरीवाल यांच्यासोबत होते. 'विकास क्रांती रॅली'त केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. महत्वाचे म्हणजे, या रॅलीदरम्यान अरविंद केजरीवाल यांनी, I.N.D.I.A. च्या बैठकीत जागा वाटप होण्यापूर्वीच मोठे संकेत दिले आहेत. लोकसभा निवडणुकीत आप पंजाबमधील सर्वच्या सर्व 13 जागांवर निवडणूक लढू शकते.
भटिंडा येथेल जनतेला आवाहन करत अरविंद केजरीवाल म्हणाले, लोकसभा निवडणुकीत पंजाबच्या सर्व 13 जागा आम्हाला द्या आणि आमचे हात आणखी मजबूत करा. दिल्लीतील काम बघून आपण पंजाबात आम्हाला मतदान केले. 117 पैकी 92 जागा दिल्या. आता येथील इतर पक्षांमध्ये त्यांची नौकरी गेल्याची भावना आहे. पुढच्या वेळी आम आदमी पार्टी 117 पैकी 110 पेक्षाही अधिक जागा जिंकेल असे माझे मन सांगते. आता लोकसभा निवडणुका येत आहेत. पंजाबमध्ये 13 तर चंदीगडमध्ये एक जागा आहे. आज, पंजाबमधील घरा-घरात ज्या प्रकारे आनंदाचे वातावरण आहे, प्रत्येक व्यक्तीचा फायदा होत आहे. या 13 जागा आम्हाला द्या आणि आमचे हात आणखी बळकट करा.
केंद्र सरकारवर निशाणा - केंद्र सरकारवर निशाणा साधताना केजरीवाल म्हणाले, भगवंत मान यांचे काम पाहून येथील सर्वच विरोधीपक्ष गडबडले आहेत. या सर्वांनी केंद्राकडे जाऊन सांगितले की, हे एवढी कामे करत आहेत, त्यांना रोखा. यानंतर, केंद्राने घाणेरडे काम केले आणि पंजाबचे आरोग्य आणि रस्त्यांचे पैसे रोखले.
एवढेच नाही, तर 'मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेंतर्गत' नांदेड साहिब, हुजूर साहिब आणि पटना साहिबला जाणाऱ्या ट्रेन देण्यासही नकार दिला. आमच्या पंजाबच्या जनतेला केंद्र सरकार दुखावत आहे. जर तुम्ही एखाद्याला माथा टेण्यापारून रोखले तर, देव क्षमा करत नाही. दिल्लीतही बरीच कामे थांबविण्याचा प्रयत्न झाला, मात्र आम्ही एकही काम थांबू दिले नाही. त्याच पद्धतीने पंजाबची कामेही थांबणार नाहीत, असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे.