रायचूर (कर्नाटक) : प्रज्वल रेवण्णा प्रकरणामुळे पंतप्रधान आता कर्नाटकमध्ये यायला घाबरत आहेत, त्यांनी सर्व जाहीर सभा रद्द केल्या आहेत, असा दावा करीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी कर्नाटकात येऊन रेवण्णाबद्दल देशाला सांगा, असे आवाहन केले.
रायचूर येथील सभेत राहुल गांधी यांनी प्रज्वल रेवण्णा प्रकरण भाजप नेत्यांना माहीत होते आणि देशाबाहेर पळून जाण्यात रेवण्णा यांना मदत करण्यात आली, असा आरोप केला. प्रज्वल, त्यांचे वडील आणि माजी मंत्री एच. डी. रेवण्णा यांच्याबद्दल भाजपच्या एका नेत्याने माहिती दिली होती, परंतु त्यांच्यावर कारवाई झाली नाही. तेव्हाच प्रज्वल यांना एका सेकंदात अटक करता आली असती, परंतु तसे झाले नाही, असे राहुल गांधी म्हणाले.
सरकार खासगीकरणाची आंधळेपणाने अंमलबजावणी करून मागासवर्गीयांचे आरक्षण गुप्तपणे हिसकावून घेत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. काँग्रेस रोजगाराचे दरवाजे उघडणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांना बळकट करण्याची हमी देतो, असे त्यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे. २०१३ मध्ये सार्वजनिक क्षेत्रात १४ लाख स्थायी पदे होती, जी २०२३ पर्यंत ८.४ लाख झाली, असेही ते म्हणाले.
समानता हवी, त्यांना नड्डा नक्षलवादी म्हणतात
ज्यांना समानता हवी आहे, त्यांना भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा नक्षलवादी म्हणतात, अशी टीका करीत राहुल गांधी यांनी शिवमोग्गा येथील सभेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
‘लाेकांनी सत्ताधाऱ्यांकडे नाेकऱ्या मागाव्या’
चिरमिरी : भाजप रेशनवर पाच किलो अन्नधान्य देऊन लोकांना त्यावर अवलंबून ठेवण्याची योजना आखत आहे. त्याऐवजी लोकांनी त्यांच्याकडे नोकऱ्या मागितल्या पाहिजेत,, काॅंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी सांगितले. छत्तीसगडमधील कोरबा येथील सभेत त्या बाेलत हाेत्या.