काँग्रेस नेते अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाकडूनही चुका झाल्या असून येत्या काळात आपल्या राजकारणात, धोरणात बदल करावे लागणार असल्याचं म्हटलं आहे. इंदिरा गांधी प्रतिष्ठानमध्ये झालेल्या 'राष्ट्रीय संविधान परिषदेत' राहुल गांधी म्हणाले की, "सत्य हे आहे की काँग्रेस पक्षाला आगामी काळात आपलं राजकारण बदलावं लागेल. काँग्रेस पक्षाकडूनही चुका झाल्या आहेत, मी काँग्रेसचा असूनही हे सांगत आहे." याआधी राहुल यांनी दावा केला होता की, भाजपा 180 पेक्षा जास्त जागा जिंकणार नाही.
राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. "मी एका गोष्टीची गॅरंटी देतो की, आता होणाऱ्या निवडणुकीत नरेंद्र मोदीजी पंतप्रधान होणार नाहीत. तुमची इच्छा असेल तर मी सही करून देईन. मोदींची रणनीती ही भावाला भावासोबत लढायला भाग पाडण्याची आहे आणि या निवडणुकीत हे काम करत नाही. जर यामध्ये चीटिंग केली तर हरकत नाही, पपण त्यांचा पक्ष 180 (जागा) च्या पुढे जात नाही."
"एक तर अशा प्रकारचे लोक आहेत जे आयुष्यभर सत्तेच्या मागे धावत असताना सत्य स्वीकारत नाहीत. ते स्वतःचे सत्य स्वीकारत नाहीत आणि इतर कोणाचेही सत्य स्वीकारत नाहीत. आणि एकच गोष्ट त्यांना फक्त माहीत असते ती म्हणजे कोणत्या ना कोणत्या प्रकारे सत्ता आपल्या हातात आली पाहिजे, बाकीचे सर्व काही सोडा. दुसऱ्या प्रकारचे लोक हे सत्य आहे आणि ते मी स्वीकरतो असं म्हणतात" असं सांगत राहुल गांधींनी टोला लगावला आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या भारत जोडो यात्रेचा संदर्भ देत आपली भूमिका स्पष्ट केली. "सत्य हे आहे की, मी जनतेचा आवाज आहे. भारत जोडो यात्रेत मला समजलं की मी जनतेचा आवाज आहे, लोकांच्या वेदना आहेत आणि याशिवाय मी काहीही नाही. मला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीत रस नाही. आता पुढे काय करायचं असा प्रश्न पडतो. कोणाचेही नुकसान करायचं नाही, सर्वप्रथम भारताचे सामाजिक सत्य देशासमोर ठेवायचं आहे. कोणालाही धमकवायचं नाही, मारायचं नाही" असंही राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.