काँग्रेसलाच नकोय देशाची राज्यघटना; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 10:00 AM2024-05-03T10:00:41+5:302024-05-03T10:04:25+5:30
येथील प्रचारसभेत पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेसला मुस्लीम समुदायाला आरक्षण द्यायचे आहे, कारण पक्षाची ती आवडती व्होट बँक आहे.
आनंद (गुजरात) :काँग्रेस अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय, ओबीसींचे आरक्षण मुस्लीम समुदायाला देण्यासाठी भारताची घटना बदलू इच्छिते, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे केला.
येथील प्रचारसभेत पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेसला मुस्लीम समुदायाला आरक्षण द्यायचे आहे, कारण पक्षाची ती आवडती व्होट बँक आहे. त्यासाठी त्यांना राज्यघटना बदलायची आहे. मी काँग्रेसला आव्हान देतो की, मुस्लीम समुदायाला धार्मिक आधारावर आरक्षण देण्यासाठी ते राज्यघटना बदलणार नाहीत, असे त्यांनी लेखी द्यावे. राज्यघटनेची प्रत डोक्यावर घेऊन नाचण्यात काही अर्थ नाही. राज्यघटनेसाठी जगायचे आणि मरायचे हे शिकायचे असेल तर मोदींकडे या. विरोधी पक्षनेते सलमान खुर्शीद यांची भाची मारिया आलम यांच्या ‘व्होट जिहाद’च्या आवाहनावरही मोदींनी टीका केली. ‘आता, इंडिया आघाडी ‘व्होट जिहाद’ पुकारते आहे. हे नवीन आहे, कारण आम्ही आतापर्यंत ‘लव्ह जिहाद’ आणि ‘लँड जिहाद’ बद्दल ऐकले आहे. हे एका सुशिक्षित मुस्लीम कुटुंबातील एका व्यक्तीने सांगितले आहे, ज्याने मदरशात शिक्षण घेतलेले नाही. एकाही काँग्रेस नेत्याने त्याचा निषेध केला नाही’, असेही ते म्हणाले.
काँग्रेसचा हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न
मोदी यांनी सुरेंद्रनगर येथे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या भगवान राम आणि भगवान शिव यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल केला. विरोधी पक्ष हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे, असे माेदी म्हणाले. ही निवडणूक मोदींच्या मिशनसाठी आहे, महत्त्वाकांक्षेसाठी नाही ‘सध्याच्या लोकसभा निवडणुका मोदींच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी नसून ध्येय पूर्ण करण्यासाठी आहेत’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुनागढ येथील प्रचारसभेत सांगितले.