रायपूर - छत्तीसगडमधील लोकसभेच्या एकूण ११ पैकी ६ जागा ज्या भारतीय जनता पक्षाचे बालेकिल्ले आहेत जिथे वर्ष २००० मध्ये राज्याच्या स्थापनेपासून कधीही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला नाही, या जागा जिंकण्यासाठी काँग्रेसने शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. तर, दुसरीकडे राज्यात सत्ताधारी भाजपला या जागा कायम ठेवत राज्यातील इतर जागा जिंकण्याची आशा आहे.
या ६ जागांत कांकेर, सुरगुजा, रायगड, जांजगीर-चांपा, रायपूर आणि बिलासपूर या जागांचा समावेश आहे. भाजपचे राज्यातील सहा लोकसभा बालेकिल्ले जिंकण्यासाठी काँग्रेसने एक विद्यमान आमदार, एका मंत्र्यासह दोन माजी आमदार, दोन नवे चेहरे आणि एक अनुभवी नेत्याला निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहे.
- रायपूर : या मतदारसंघात भाजपने विद्यमान राज्य सरकारमधील मंत्री आणि आठ टर्म आमदार असलेले ब्रिजमोहन अग्रवाल यांना तर, काँग्रेसने माजी आमदार विकास उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे. - कांकेर : कांकेर लोकसभा मतदारसंघातही भाजपने विद्यमान खासदार मोहन मांडवी यांना तिकीट नाकारुन माजी आमदार भोजराज नाग यांना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसने पंचायत संस्थांचे प्रतिनिधित्व करणारे बिरेश ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. - जांजगीर-चांपा : भाजपने या मतदारसंघातून विद्यमान खासदार गुहाराम अजगले यांचे तिकीट कापून महिला नेत्या कमलेश जांगडे या नव्या चेहऱ्याला उमेदवारी दिली आहे. तर, काँग्रेसने माजी राज्यमंत्री शिवकुमार दहरिया यांना तिकीट दिले. - रायगड : मुख्यमंत्री विष्णू देव साय यांचा गृह जिल्हा आहे. यावेळी भाजपने राधेश्याम राठिया या नव्या चेहऱ्याला तिकीट दिले आहे, तर काँग्रेसने राज्यातील सारंगगड राजघराण्यातील मेनका देवी सिंह यांच्यावर आशा पल्लवित केल्या आहेत.- सुरगुजा : येथे भाजपने प्रत्येक निवडणुकीत उमेदवार बदलला आहे. यावेळीही रेणुका सिंह यांच्याऐवजी काँग्रेसमधून बाहेर पडलेले माजी आमदार चिंतामणी महाराज यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. माजी राज्यमंत्री तुलेश्वर सिंह यांच्या कन्या शशी सिंह यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. - बिलासपूर : बिलासपूर मतदारसंघात भाजपचे माजी आमदार टोखान साहू आणि काँग्रेसचे विद्यमान आमदार देवेंद्र यादव यांच्यात लढत होणार आहे.