काँग्रेसने मोदींविरोधात बड्या नेत्याला उतरवलं मैदानात, चौथ्या यादीतून ४६ जणांना उमेदवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 11:45 PM2024-03-23T23:45:37+5:302024-03-23T23:47:04+5:30
Lok Sabha Election 2024: काँग्रेसने इंडिया आघाडीच्या माध्यमातून उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षासोबत आघाडी केली होती. त्यानंतर काँग्रेस पक्षाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याविरोधात वाराणसी मतदारसंघातून कुणाला उमेदवारी दिली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
काँग्रेसने इंडिया आघाडीच्या माध्यमातून उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षासोबत आघाडी केली होती. त्यानंतर काँग्रेस पक्षाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसी मतदारसंघातून कुणाला उमेदवारी दिली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. दरम्यान, काँग्रेसने वाराणसीमधून अजय राय यांना उमेदवारी दिली आहे. २०१४ आणि २०१९ मध्येही अजय राय यांनी नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र दोन्ही वेळा त्यांचा पराभव झाला होता.
काँग्रेसने आज प्रसिद्ध केलेल्या चौथ्या यादीमधून एकूण ४६ मतदारसंघातील उमेदवार जाही केले आहेत. त्यात अनेक दिग्गज नेत्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामध्ये मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांना मध्य प्रदेशमधील राजगड येथून उमेदवारी दिली आहे. तर कार्ती चिदंबरम यांना तामिळनाडूमधील शिवगंगा येथून उमेदवारी देण्यात आली आहे. महाराष्ट्रामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात आमदार विकास ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
काँग्रेसने आज प्रसिद्ध केलेल्या यादीमध्ये आसाम, अंदमान निकोबार आणि छत्तीसगड आणि मिझोराममधील एक, मणिपूर आणि जम्मू काश्मीरमधील दोन, मध्य प्रदेशमधील १२, महाराष्ट्रातील ४, राजस्थानमधील ३, तामिळनाडूमधील ७ उत्तर प्रदेशमधील ९, उत्तराखंडमधील दोन आणि पश्चिम बंगालमधील एका उमेदवाराचा समावेश आहे.