Lok Sabha Election 2024 : सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. तिसऱ्या टप्प्याचा प्रचार जोरात सुरू आहे. या लोकसभा निवडणुकीत NDA आणि I.N.D.I.A आघाडी यांच्यात थेट लढत आहे. अनेक राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. उत्तर प्रदेशसारख्या सर्वाधिक जागा असलेल्या राज्यात भाजपची पकड मजबूत असली तरी त्यांच्यासमोर समाजवादी पार्टीचे आव्हान आहे. अशातच काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे उमेदवार शशी थरूर यांनी विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या भवितव्याबाबत एक मोठा दावा केला आहे. आता जरी काही संभ्रम असला तरी निवडणुकीनंतर सर्व विरोधी पक्ष एकत्र येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विरोधी पक्ष आताच्या घडीला एकत्र प्रचार करत असतील किंवा एकमेकांच्या विरोधात... पण लोकसभा निवडणुकीनंतर ते सर्वजण एकत्र येतील. एकमेकांशी हातमिळवणी करून इंडिया आघाडीत काम करतील. त्यांनी एकत्र येऊन काम केल्यास जनतेला असा पंतप्रधान मिळेल जो सामान्य लोकांसाठी काम करणारा असेल आणि इंडिया आघाडीच्या नेतृत्वातील सरकार इतरांना विश्वासात घेऊन काम करेल, असे शशी थरूर यांनी म्हटले. ते पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलत होते.
इंडिया आघाडीचे सरकार कसे असेल?थरूर म्हणाले की, इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर प्रथमच मोठ्या कालावधीनंतर असा पंतप्रधान मिळेल, जो सामान्य लोकांसाठी काम करणारा असेल. त्यांना प्राधान्य देईल, सर्वसामान्यांना डोळ्यासमोर ठेऊन निर्णय घेतले जातील. यासाठी एक चांगला व्यवस्थापक असावा लागतो. आमच्या सरकारच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेने चांगली कामगिरी केली आहे. राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला काँग्रेस नेते उपस्थित राहिले नाहीत ते योग्यच होते. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गौरव करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मोदींची कार्यशैली, त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि भाजपच्या कारभाराची शैली पाहता हे सरकार बदलल्यावर मागील दहा वर्षात जे झाले त्याहून काही तरी नक्कीच वेगळे होईल असा मला विश्वास आहे.
तसेच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे बहुमत नव्हते, त्यांच्या सरकारमध्ये २६ पक्षांचा समावेश होता. परंतु त्यांचे सरकार प्रभावी कामगिरी करण्यात यशस्वी ठरले. केरळमधील काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या स्थिती महत्त्वाची ठरते. युती अनेकदा निवडणुकीनंतर होते. लोकसभा निवडणुकीचा ४ जून रोजी जेव्हा निकाल जाहीर होईल. तेव्हा भाजपला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी तृणमूल काँग्रेससह सर्व पक्ष एकत्र येतील, असेही शशी थरूर यांनी सांगितले.