Padmaja Venugopal : नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपासह सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने दक्षिणेकडील केरळ राज्यात मोठा राजकीय डाव खेळला आहे. केरळ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री के. करुणाकरन यांची कन्या पद्मजा वेणुगोपाल यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पद्मजा वेणुगोपाल या काँग्रेस पक्षावर नाराज होत्या. त्यांची नाराजीही उघडपणे समोर येत होती. त्यामुळे पद्मजा वेणुगोपाल काँग्रेसमधून बाहेर पडतील, अशी शक्यता वर्तविली जात होता. अखेर पद्मजा वेणुगोपाल यांनी काँग्रेसला धक्का देत भाजपात प्रवेश केला. गुरुवारी दिल्लीतील भाजपा मुख्यालयात भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रकाश जावडेकर यांनी पद्मजा वेणुगोपाल यांना पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व दिले.
भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर पद्मजा वेणुगोपाल म्हणाल्या, "मी आता खूप खूश आहे. काँग्रेसमध्ये इतकी वर्षे खूश नव्हते. त्यामुळे मी पहिल्यांदाच पक्ष बदलत आहे. मी काँग्रेस पक्षप्रमुखांकडे तक्रार केली होती, पण प्रतिसाद मिळाला नाही. मी काँग्रेस नेतृत्वाला भेटायलाही आले पण त्यांनी माझ्याकडे पाहिले नाही... मला सोनिया गांधींबद्दल खूप आदर आहे, पण त्यांनी मला कधीच वेळ दिला नाही."
दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी आठवडाभरापूर्वी लोकसभा निवडणुकीत केरळमध्ये भाजपाला दोन अंकी जागा मिळवून देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वाकांक्षेची खिल्ली उडवली होती. केरळमध्ये 'टू झिरो' मिळवूनच आपण ही कामगिरी करू शकलो, असे थरूर म्हणाले होते. तसेच, केरळमध्ये भाजपाचा एकच नंबर येत आहे आणि तो म्हणजे 'शून्य' आहे, असे थरूर म्हणाले होते. दरम्यान, आता पद्मजा वेणुगोपाल भाजपामध्ये दाखल झाल्याने केरळमध्ये भाजपाला बळ मिळणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएसमोर ४०० जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी भाजपाचे नेते, पदाधिकारी कामाला लागले असून, प्रत्येक राज्यात जवळपास सर्वच्या सर्व जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी बऱ्याच पक्षांची साथ मिळविण्यात भाजपाला यश आले आणि सोबतच विरोधकांचे बळ कमी करण्याची रणनीतीही बरीच यशस्वी झाली. त्यामुळे भाजपा नेत्यांचा आत्मविश्वास वाढला असून, सर्वच राज्यांत तसे प्रयत्न सुरू केले आहेत.