पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मौनव्रतावर काँग्रेसने घेतला आक्षेप, केली अशी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 08:41 PM2024-05-29T20:41:42+5:302024-05-29T20:42:16+5:30
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कन्याकुमारीमधील रॉक मेमोरियल येथे जाऊन ध्यानधारणा करण्याची घोषणा केली आहे. ३० मे ते १ जून या काळात मोदी तिथे ध्यानस्थ राहणार आहेत. मात्र मोदींची ही ध्यानधारणा आणि मौन व्रताविरोधात काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आटोपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कन्याकुमारीमधील रॉक मेमोरियल येथे जाऊन ध्यानधारणा करण्याची घोषणा केली आहे. ३० मे ते १ जून या काळात मोदी तिथे ध्यानस्थ राहणार आहेत. मात्र मोदींची ही ध्यानधारणा आणि मौन व्रताविरोधात काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे. काँग्रेसचे नेते आणि ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने आज निवडणूक आयोगाच्या कार्यालयात धाव घेत आपला आक्षेप नोंदवला.
अभिषेक मनू सिंघवी म्हणाले की, आम्ही निवडणूक आयोगाला ४८ तासांच्या काळात कुणालाही प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे प्रचार करण्याची परवानगी दिली जाता कामा नये. कुठलाही नेता काहीही करो, आमचा त्यावर आक्षेप नाही. त्यांना हवं असेल तर मौनव्रत ठेवावं किंवा आणखी काही करावं. मात्र मतदानापूर्वीच्या ४८ तासांमध्ये अप्रत्यक्ष प्रचार होता कामा नये. नरेंद्र मोदी यांनी ३० मे रोजी संध्याकाळी मौन व्रतासाठी बसण्याची घोषणा केली आहे. हा मौनकाळ ३० मे पासून ते १ जून पर्यंत असेल. हे आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन आहे. हा प्रचार सुरू ठेवण्याचा किंवा स्वत:ला चर्चेत ठेवण्याचा हातखंडा आहे. आम्ही निवडणूक आयोगाला सांगितले आहे की नरेंद्र मोदी यांना १ जून रोजी संध्याकाळी मौनव्रत ठेवण्याची परवानगी द्यावी. मात्र त्यांना याच काळाता मौनव्रत ठेवायचे असल्यास त्यांचं माध्यमांमध्ये प्रसारण होण्यास बंदी घातली पाहिजे.
दरम्यान, नरेंद्र मोदींच्या मौनव्रतावर काँग्रेसबरोबरच टीएमसीनेही टीका केली आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ध्यान धारण करताना कॅमेरा नेणं आवश्यक आहे का. मोदी ध्यान धारण करू शकतात. मात्र त्याचं टीव्हीवर प्रसारण होता कामा नये. तसं झाल्यास आम्ही त्याविरोधात तक्रार करू, असा इशारा त्यांनी दिला.