Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 12:23 PM2024-05-12T12:23:05+5:302024-05-12T12:26:29+5:30
Pm Narendra Modi : लोकसभा निवडणुकीची देशभरात रणधुमाळी सुरू आहे. सात टप्प्यात मतदान होणार असून तीन टप्प्यातील मतदान पार पडले आहे.
Pm Narendra Modi ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीची देशभरात रणधुमाळी सुरू आहे. सात टप्प्यात मतदान होणार असून तीन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. आता चौथ्या आणि पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या देशभरात प्रचारसभा सुरू आहेत. नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान, लोकमत समूहाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये पीएम मोदींनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला तसेच एनडीए आणि इंडी आघाडीतील फरक सांगितला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकमत समुहाला विशेष मुलाखत दिली. लोकमत समुहाचे सह व्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा, समूह संपादक विजय बाविस्कर, मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी, लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव यांनी पंतप्रधानांना अनेक मुद्द्यावर प्रश्न विचारले. त्यावेळी नरेंद्र मोदींनीही दिलखुलास उत्तरे दिली.
या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना,विरोधी पक्षांचे मत आहे की, तुमची महायुती अधिक काळ टिकणार नाही? हा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना पीएम मोदींनी इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली.
प्रश्न: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विकास हा मुद्दा होता. मात्र, अचानक असे काय घडले की हिंदू कार्ड, मंगळसूत्र आणि पाकिस्तान हे मुद्दे प्रचारात आणावे लागले?
उत्तर: मी आधी म्हटल्याप्रमाणे तुम्ही माझ्या भाषणांचा बारकाईने अभ्यास केला तर आम्ही आमच्या सत्ताकाळात काय चांगले काम केले, हे सांगण्यावर माझा अधिक भर असतो, हे तुमच्या लक्षात येईल. मात्र, प्रसारमाध्यमांना इतर मुद्द्यांमध्ये अधिक रूची आहे. काँग्रेस आणि इंडी आघाडीची जी लक्तरे मी वेशीवर टांगतो त्यावर आधारलेले मथळे देण्यातच प्रसारमाध्यमांना अधिक आवडते. मला तुम्हालाच विचारावेसे वाटते. लोकांकडील संपत्तीचे सर्वेक्षण करून ज्याच्याकडे अधिक असेल ती काढून घेऊन इतरांना संपत्तीचे वितरण केले जाईल, असे काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात म्हटले आहे. याबद्दल मी बोलायला हवे, हो की नाही? पाकिस्तान सरकारातील प्रभावी लोकांचा काँग्रेस पक्षाला पाठिंबा आहे, हे मी निदर्शनास आणून दिले पाहिजे की नको? काँग्रेसने जर संविधानाला बाजूला सारत धर्माच्या आधारावर आरक्षण दिले असेल तर त्यावर बोलायला हवे की नको?
प्रश्न: आपण काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर जोरदार हल्ला का चढवला?
उत्तर: तुम्ही काँग्रेसचा जाहीरनामा पाहिला आहे ना? त्यात अनेक घातक कल्पना मांडण्यात आल्या आहेत. तुम्हाला काँग्रेसच्या तुष्टीकरणाचा इतिहास ठावूकच आहे. काँग्रेसचे राजपुत्र कशी माओवाद्यांची भाषा बोलत आहेत, हेही तुम्ही पाहात आहात. त्यामुळे या सर्व मुद्द्यांकडे बोट दाखवणे, त्यातील उणिवा निदर्शनास आणून देणे, हे प्रसारमाध्यमांचे कर्तव्य नाही का?
प्रश्न: काँग्रेस आणि भाजप यांच्या दृष्टिकोनातील नेमका फरक काय आहे?
उत्तर: विरोधकांचा हेतू समजण्यासाठी तुम्हाला त्यांचे राजकारण समजून घ्यावे लागेल. २०१४ पूर्वी त्यांचे राजकारण लोकांमध्ये जातीपातीवरून भेद निर्माण करत काही धार्मिक व्होट बँक तयार करणे, यावर चालत होते. विकास हा मुद्दा त्यांच्या अजेंड्यावर कधीच नव्हता. त्यामुळेच स्वातंत्र्यानंतरच्या ६० वर्षांनंतरही आपल्या लोकांना विशेषत: अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीयांना स्वच्छतागृहे, नळ जोडण्या आणि डोईवरील छप्पर या मूळ गोष्टींसाठी संघर्ष करावा लागत होता. लोकांना विकास हवा आहे. त्यांना अमूक पक्षाशीच बांधून राहणे फारसे रुचत नाही. जो पक्ष त्यांच्यासाठी काम करतो त्याच्या मागे जाण्यात लोकांना कमीपणा वाटत नाही. त्यामुळे साहजिकच लोक आमच्याकडे येतात. कारण भाजपाची विकासावर श्रद्धा आहे. आम्ही केवळ याच मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे आम्हाला समाजाच्या सर्व स्तरांतून पाठिंबा मिळत आहे. यापूर्वी काँग्रेस फक्त त्यांची मते मिळवायची. आमच्या या दृष्टिकोनामुळे आता काँग्रेस अस्वस्थ झाली आहे.
प्रश्न: विरोधी पक्षांचे मत आहे की, तुमची महायुती अधिक काळ टिकणार नाही...
उत्तर: केंद्रात २०१४ आणि २०१९ मध्ये आम्हाला स्पष्ट बहुमत असूनही आम्ही आमच्या मित्रपक्षांना सरकारमध्ये योग्य स्थान दिले. एक लक्षात घ्या, महाराष्ट्रात आम्ही सर्वात मोठा पक्ष असूनही मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. काँग्रेसचे मात्र तसे नसते. त्यांना आपल्या मित्रपक्षांना कमकुवत करायचे असते. आताही तुम्ही इंडी आघाडीकडे पाहिले तर काँग्रेसचे शहजादे केरळमध्ये त्यांच्या स्वत:च्या आघाडीतील घटक पक्षाविरोधात निवडणूक लढवत आहेत. त्यांचा पक्ष पश्चिम बंगालमध्ये त्यांच्याच आघाडीतील मित्रपक्षाशी लढत आहे, असे चित्र तुम्हाला दिसेल. एनडीए आणि इंडी आघाडीतील या फरकाची तुलना केली तर कोण सगळ्यांना बरोबर घेऊन जाते आणि स्थिर व मजबूत सरकारचा वायदा करते, हे तुमच्या सहजपणे लक्षात येईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची संपूर्ण मुलाखत वाचण्यासाठी इथे क्लिक करा