केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ज्याप्रमाणे डायनासोर पृथ्वीवरून नाहीसे झाले, त्याचप्रमाणे काही दिवसांत काँग्रेसही पृथ्वीवरून नाहीशी होईल, असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. मध्य प्रदेशातील खांडवा येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना राजनाथ सिंह यांनी काही वर्षांनी मुलं विचारतील कोण काँग्रेस? असं म्हटलं आहे.
खांडवा येथील निवडणूक रॅलीला संबोधित करताना केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, "पंडित जवाहरलाल नेहरू म्हणत होते की, आमचं सरकार स्थापन झालं तर देशातून गरिबी दूर करू. इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि डॉ. मनमोहन सिंग यांनीही सांगितलं होतं. पण गरिबी कोणीही दूर केली नाही, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली 25 कोटींहून अधिक लोकांना गरिबीतून बाहेर काढलं आहे."
राजनाथ सिंह यांनी अनेक मुद्द्यांवरून काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे. सूरत आणि इंदूरचा उल्लेख करून ते म्हणाले की, "एक चमत्कार घडला आहे, काँग्रेसचे उमेदवार भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. याआधीही लोकसभा निवडणुकीत 20 वेळा उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचं त्यांनी उपरोधिकपणे सांगितलं. पण तेव्हा लोकशाही धोक्यात आली नाही."
"भाजपाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले तर लोकशाही धोक्यात आल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. काँग्रेस हे बुडणारे जहाज असून जगातील कोणतीही शक्ती त्यांना बुडण्यापासून वाचवू शकत नाही. आता काँग्रेसला घालवायचं हे जनतेने ठरवलं आहे" असंही राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.