एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेस सहभागी होणार नाही; पक्ष हायकमांडचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 06:57 PM2024-05-31T18:57:04+5:302024-05-31T18:57:25+5:30
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर एक्झिट पोल जाहीर होईल.
Lok Sabha Election 2024 : उद्या, म्हणजेच 1 जून रोजी लोकसभा निवडणुकीसाठी शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. मतदारानंतर लगेच सायंकाळी एक्झिट पोल जाहीर होतील. विविध राजकीय पक्षांसोबतच सर्वसामान्य नागरिकही यावर विशेष लक्ष ठेवून आहेत. विविध वृत्तवाहिन्यांवर पक्षाचे नेते या एक्झिट पोलच्या चर्चेत सहभागी होत असतात. पण, यंदा या एक्झिट पोलच्या चर्चेत काँग्रेस सहभागी होणार नाही.
एखाद्या पक्षाला निवडणुकीत किती जागा मिळू शकतात, याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये दिला जातो. विविध एजन्सी ही आकडेवारी जाहीर करतील. आकडेवारी जाहीर झाल्यानंतर पक्षाचे प्रवक्ते विविध वृत्त वाहिन्यांच्या चर्चेत सहभागी होऊन आपल्या पक्षाची बाजू मांडतात. पण, यंदा या एक्झिट पोलच्या चर्चेत पक्ष सहभागी होणार नाही, असा निर्णय काँग्रेस हायकमांडने घेतला आहे. काँग्रेस नेते पवन खेरा यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली आहे.
आगामी एग्जिट पोल डिबेट्स में पार्टी द्वारा भाग ना लिये जाने के निर्णय पर हमारा वक्तव्य :
— Pawan Khera 🇮🇳 (@Pawankhera) May 31, 2024
मतदाताओं ने अपने मत दे दिया है एवं मतदान के परिणाम मशीनों में बंद हो चुके हैं।
4 जून को परिणाम सबके सामने होंगे। भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की नज़रों में परिणाम घोषित होने से पहले किसी भी…
काँग्रेसला विजयाचा विश्वास
दरम्यान, लोकसभा निवडणुकीचे निकाल इंडिया आघाडीच्या बाजूने लागतील, असा काँग्रेसचा विश्वास आहे. एवढंच नाही तर पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांचा दावा आहे की, 4 जून रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर एनडीएचे अनेक मित्रपक्ष इंडिया आघाडीत सहभागी होतील. ते म्हणाले की, दोन टप्प्यांनंतरच इंडिया आघाडीला बहुमत मिळाले आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, यूपी, बिहार, तेलंगणा, हरियाणा या राज्यांमध्ये काँग्रेसने यावेळी चांगली कामगिरी केली आहे, असा दावाही त्यांनी कला आहे.
शेवटच्या टप्प्यात या दिग्गजांचे भवितव्य ठरणार
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी 1 जून रोजी मतदान होणार आहे. यामध्ये 8 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील लोकसभेच्या 57 जागांवर मतदान होणार आहे. पंतप्रधान मोदी, रवी किशन, अनुराग ठाकूर, अभिषेक बॅनर्जी, मनीष तिवारी, रविशंकर प्रसाद, चरणजीत सिंह चन्नी, मीसा भारती आणि हरसिमरत कौर बादल यांच्यासह अनेक दिग्गजांचे भवितव्य उद्या ठरणार आहे.