काँग्रेसचे 'राहुलयान' न लॉन्च होऊ शकते ना लँड...राजनाथ सिंह यांची राहुल गांधींवर बोचरी टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 03:00 PM2024-04-18T15:00:11+5:302024-04-18T15:00:38+5:30
Lok Sabha Election 2024: भाजपचे दिग्गज नेते राजनाथ सिंह यांनी केरळमध्ये प्रचारसभेतून राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला.
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे. उद्या म्हणजेच, शुक्रवारी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. दरम्यान, केंद्रीय संरक्षण मंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते राजनाथ सिंह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधी 2019 च्या निवडणुकीत अमेठी लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाले, त्यामुळेच यावेळी त्यांच्यात या मततारसंघातून निवडणूक लढवण्याची हिंमत नाही, अशी टीका राजनाथ सिंह यांनी केली.
राजनाथ सिंह भाजपचे उमेदवार अनिल के अँटोनी यांच्या प्रचारासाठी केरळमध्ये आले होते. यावेळी प्रचारसभेत बोलताना राजनाथ सिंह म्हणतात, पराभवामुळेच राहुल गांधी उत्तर प्रदेशातून केरळला पळून आले. पण, आता मी असे ऐकले आहे की, यंदा वायनाडच्या जनतेने राहुल गांधींना खासदार न करण्याचा निर्णय घेतला आहे. आज देशात विविध स्पेस प्रोग्राम आणि प्रोजेक्ट्स लॉन्च केले जात आहेत, पण गेल्या 20 वर्षांत काँग्रेसचे युवा नेते त्यांना 'लाँच' होऊ शकले नाहीत. काँग्रेस पक्षाचे 'राहुलयान' ना लॉन्च होऊ शकते, ना कुठे लँड होऊ शकते, अशी बोचरी टीकाही त्यांनी यावेळी केली.
आपल्या भाषणात त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एके अँटोनी यांचे कौतुक केले आणि त्यांचे शिस्तप्रिय आणि तत्त्वनिष्ठ व्यक्ती म्हणून वर्णन केले. तसेच, त्यांच्या प्रामाणिकपणावर कुणीही प्रश्नचिन्ह उपस्थित करु शकत नाही, असेही म्हणाले. याशिवाय, आपल्याच मुलाचा पराभव व्हावा, या त्यांच्या वक्तव्यामुळे आपण आश्चर्यचकित झाल्याचे राजनाथ सिंह म्हणाले. मला माहित आहे की ते (ए. के. अँटनी) तत्त्वनिष्ठ व्यक्ती आहेत आणि मी त्यांची मजबुरी जणतो. भाजपमध्ये असलेल्या मुलाला पाठिंबा देणे, त्यांना अवघड आहे. पण, मी त्यांना सांगू इच्छितो की, तुम्ही मुलाला मत देऊ नका, पण तुमचा आशिर्वाद त्याच्यासोबत असू द्या.