बिहारमध्येही इंडिया आघाडीला तडे? पूर्णियामध्ये बीमा भारतींना उमेदवारी देत लालूंकडून पप्पू यादवांचा गेम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 07:18 PM2024-03-27T19:18:56+5:302024-03-27T19:20:43+5:30
Lok Sabha Election 2024: केंद्रातील सत्ताधारी असलेला भाजपा (BJP) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात व्यापक पर्याय देण्याच्या इराद्याने स्थापन झालेल्या विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीचा (INDIA Opposition Alliance) बिहारमध्येही धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
केंद्रातील सत्ताधारी असलेला भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात व्यापक पर्याय देण्याच्या इराद्याने स्थापन झालेल्या विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीचा बिहारमध्येही धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बिहारमधील महाआघाडीतील काँग्रेस आणि आरजेडी या घटक पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या पूर्णिया लोकसभा मतदारसंघात लालू प्रसाद यादव यांनी बीमा भारती यांना उमेदवार बनवले आहे. काँग्रेसकडून पप्पू यादव पूर्णिया मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छूक होते. मात्र लालू प्रसाद यादव यांनी बीमा भारती यांना उमेदवारी देत पप्पू यादव यांना धक्का दिला आहे.
बीमा भारती यांनी २३ मार्च रोजी जेडीयूचा राजीनामा दिला होता. त्यांचे राजीनामा पत्र समाजमाध्यमामध्ये प्रसारित झाल्यानंतर तेजस्वी यादव यांनी काही तासांमध्येच त्यांना राष्ट्रीय जनता दलामध्ये प्रवेश दिला होता. बिहार सरकारमधील माजी राज्यमंत्री बीमा भारती ह्या पूर्णिया जिल्ह्यातील रूपौली विधानसभा मतदारसंघांचं प्रतिनिधित्व करत होत्या. मागच्या महिन्यात बिहार विधानसभेमध्ये जेव्हा नितीश कुमार सरकारची बहुमत चाचणी सुरू असताना जेडीयूमध्ये असलेल्या बीमा भारती अनुपस्थित राहिल्या होत्या. त्यांच्या अनुपस्थितीतीची त्यावेळी खूप चर्चा झाली होती.
दरम्यान, पूर्णिया लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाल्याची घोषणा बीमा भारती यांनी स्वत: केली असून, आपण राष्ट्रीय जनता दलाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. बीमा भारती ह्या ३ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. दरम्यान, लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून मला आशीर्वाद दिले आहेत, असेही बीमा भारती यांनी सांगितले.
दरम्यान, पूर्णिया लोकसभा मतदारसंघ डोळ्यासमोर ठेवून पप्पू यादव यांनी आपल्या पक्षाचं काँग्रेसमध्ये विलिनीकरण केलं होतं. तसेच येथून निवडणूक लढवण्याची इच्छाही त्यांनी वारंवार व्यक्त केली होती. मागच्या पाच वर्षांत मी पूर्णियामध्ये खूप काम केलं आहे, असं पप्पू यादव यांनी एका मुलाखतीमधून सांगितले आहे.