जितेंद्र प्रधान
जयपूर : राजस्थानमधील लोकसभेच्या २५ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान पार पडले. एका मोठ्या राज्यातील मतदानप्रक्रीया पूर्ण झाली असून यावेळी भाजपप्रणित एनडीए विरोधकांना पुन्हा क्लीन स्वीप देणार का? याकडे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे, ८ मतदारसंघात पुरुषांपेक्षा महिलांनी जास्त मतदान केले आहे.
राजस्थानात पहिल्या टप्प्यात ५८.२८ टक्के तर, दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी ६५ टक्के मतदान झाले. राजस्थानमध्ये केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल, लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे पुत्र दुष्यंत सिंह, माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे पुत्र वैभव इत्यादी दिग्गज उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे. भाजपने गेल्या निवडणुकीत २४ जागा, तर सहयोगी 'आरएलडी'ने १ जागा जिंकून सर्व २५ जागा एनडीएला मिळवून दिल्या. यावेळीही भाजपने सर्व जागा जिंकण्याचा दावा केला आहे. मात्र, यंदा आव्हान कडवे आहे.
आयाराम-गयारामांचे काय होणार?
: राजस्थानात जवळपास १२ आयाराम-गयाराम उमेदवार आहेत. त्यापैकी ४ जण एनडीएमध्ये आलेले आहेत. तर हनुमान बेनीवाल यांनी वेगळी चूल मांडून भाजपच्या विरोधात लढत आहेत.
घटलेले प्रमाण कोणाच्या पारड्यात टाकणार विजय?
गेल्या निवडणुकीत ६६.३४ टक्के मतदान झाले होते. तर यावेळी दोन्ही टप्पे मिळून राजस्थानात ६२.१० टक्के मतदान झाले आहे. जवळपास ४ टक्के मतदान कमी झाले आहे. त्यामुळे सर्व उमेदवारांच्या गोटात धास्ती आहे. घटलेले प्रमाण कोणाच्या पारड्यात विजयाचे दान टाकतो, याची चर्चा सुरू आहे.