दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपामध्ये सध्या उत्तराधिकारीवरून भांडण सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान मोदींना अमित शाह यांना आपला उत्तराधिकारी म्हणून पाहायचं आहे असंही केजरीवाल म्हणाले.
इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत केजरीवाल म्हणाले की, "तुम्ही इंटरनेटवर पाहू शकता, अमित शाह 2019 मध्ये म्हणाले होते की, आम्ही 75 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व नेत्यांना निवृत्त करत आहोत. यामध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही. 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी स्वतः हा नियम लागू केला होता."
"ज्यामध्ये असं म्हटलं होतं की वयाची 75 वर्षे पूर्ण झाल्यानंतर पक्ष (भाजपा) आणि सरकारमध्ये कोणाचीही जबाबदारी दिली जाणार नाही. या कारणामुळेच अडवाणीजी (लालकृष्ण अडवाणी) आणि मुरली मनोहर जोशीजी निवृत्त झाले. सुमित्रा महाजनजी त्यानंतर निवृत्त झाल्या होत्या, त्यामुळे ते स्वतः हा नियम पाळतील."
"सध्या उत्तराधिकारी याबाबत पक्षांतर्गत भांडण सुरू आहे. पंतप्रधानांनी एक एक करून सर्व नेत्यांना बाजूला केलं आहे. शिवराजसिंह चौहान, वसुंधरा राजे, खट्टर साहेब आणि डॉ. रमण सिंह यांना हटवण्यात आलं आहे. उरले फक्त योगीजी. निवडणुकीनंतर त्यांनाही हटवण्यात येणार असल्याच्या अफवा आहेत."
जामिनावर बाहेर आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी अनेकवेळा भाजपावर हे असे आरोप केले आहेत. याच दरम्यान, भाजपाने आप प्रमुखांचा दावा फेटाळून लावला आहे. नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान होतील आणि तिसरा कार्यकाळ पूर्ण करतील, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे.